- विशेष प्रतिनिधीमुंबई - खोटेनाटे सांगून भ्रम पसरवायचा आणि काहीही करून सत्ता हस्तगत करण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. पण महाआघाडीच काय कुठली महामहाआघाडी झाली तरी भाजपाला केंद्र आणि राज्यात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपा कार्यसमिती बैठकीत व्यक्त केला.दोन दिवसांच्या या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाला. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हंसराज अहीर, डॉ.सुभाष भामरे, राज्यातील मंत्री, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मंचावर उपस्थित होते.पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये जोष भरताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या कामगिरीवर उत्तर देण्यास विरोधकांकडे जागा नाही म्हणून ते कधी जात तर कधी खोटे बोला पण रेटून बोला या न्यायाने टीका करतील. तुम्ही प्रत्येक माणसाशी संवाद साधा, असे आवाहन त्यांनी केले.मोदी सरकारने राफेल विमान खरेदीतील दलालांची व्यवस्था संपविली, सरकारचा पैसाही वाचविला.राफेलच्या मुद्यावर उद्या संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी झाली तर विरोधक तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत. जे लोक राफेलबाबत आरोप करीत आहेत त्यांना राफेल हे विमानआहे की सायकल हेही माहिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच हशा पिकला.काळजी करू नका, युतीचे चांगलेच होईलशिवसेनेबाबत मी काय बोलतो याबाबत माध्यमांना उत्सुकता आहे. काळजी करू नका, युतीचे चांगलेच होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. मित्रपक्ष जोडत जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाजन, पंकजा, तावडेंची प्रशंसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यांची तोंडभरून प्रशंसा केली.
महामहाआघाडी झाली तरी विजय भाजपाचाच - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 5:03 AM