महामेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल; वेळापत्रक बिघडल्याने प्रचंड गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 07:44 AM2022-01-09T07:44:34+5:302022-01-09T07:45:57+5:30
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मेगाब्लॉकच्या सूचना देण्यात येत होत्या; पण गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली, तर काही प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासाठी शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दाेन वाजेपर्यंत धिम्या मार्गावर तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉक दरम्यान उपनगरीय मार्गावरील लाेकल आणि काही मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने शनिवारी धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मेगाब्लॉकच्या सूचना देण्यात येत होत्या; पण गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली, तर काही प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले. मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान, पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.
हे काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. आता मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.