पावसाचे पाणी महामुंबई जमिनीत जिरवणार!

By सचिन लुंगसे | Published: January 19, 2024 07:24 PM2024-01-19T19:24:20+5:302024-01-19T19:24:34+5:30

समुद्रात टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टीकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रिव्हर रिसायकल ओवाय ही संस्था काम करते.

Mahamumbai will soak rain water in the ground | पावसाचे पाणी महामुंबई जमिनीत जिरवणार!

पावसाचे पाणी महामुंबई जमिनीत जिरवणार!

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील नद्यांचे संरक्षण, पूर प्रतिबंध, पावसाचे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे यासह हवामानाशी निगडीत आव्हानांवर मात करता येणार आहे. एमएमआरडीएला यासाठी हेलसिंकी, फिनलंड येथील रिव्हर रिसायकल ओवायचे सहकार्य लाभणार असून, नद्यांचे संरक्षण, पूर प्रतिबंध, पर्यावरण सुधारणा आणि हवामान बदल यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

समुद्रात टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टीकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रिव्हर रिसायकल ओवाय ही संस्था काम करते. करारामुळे या संस्थेच्या मार्गदर्शनाचा एमएमआर क्षेत्रामध्ये जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी फायदा होणार आहे. करारामुळे उभय पक्षांना फायदा होणार आहे. हवेची गुणवत्ता सुधारणे आणि एमएमआर क्षेत्र आणि आसपासच्या परिसरात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची प्रक्रिया तयार करणे यासाठी एमएमआरडीएला मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कचऱ्यापासून उर्जा, प्रभावी कचरा व्यवस्थापन यासारख्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पद्धतींचा अवलंब कसा करावा याचेही मार्गदर्शन लाभेल.
 
काय आहे लक्ष्य
एमएमआरडीएने मुंबई महानगर क्षेत्रामध्ये शाश्वत शहरांच्या निर्माणासोबतच आर्थिक प्रगती आणि ३० दशलक्ष नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.
 
मुंबई महानगर क्षेत्र आणि आसपासच्या परिसरात शाश्वत नागरी विकास करत असताना आर्थिक विकास आणि उत्तम वाहतूक व्यवस्थेसोबतच पर्यावरण संवर्धन, आणि जीवनमान उंचावणे याचीही नितांत आवश्यकता आहे. रिव्हर रीसायकल ओवायसोबत करण्यात आलेला करार हा शाश्वत विकासासाठीच्या संतुलिक दृष्टीकोनाला पूरक करार आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
 
रिव्हर रीसायकल ओवायसह करण्यात आलेला सामंजस्य करार हा एमएमआर क्षेत्राच्या शाश्वत भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी उचललेले एक विशेष पाऊल आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो लोकांवर परीणाम करणाऱ्या पर्यावरणीय समस्या दूर करता येईल आणि या नागरिकांचे जीवनमान आणखी सुखकर करता येईल. - डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: Mahamumbai will soak rain water in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.