सीआययूची कारवाई
महामूव्हीच्या सीईओला कॉपीराईट्सच्या गुन्ह्यात अटक
सीआययूची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी कॉपीराइट्सच्या गुन्ह्यात महामूव्हीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली. त्यांनी निर्माते, दिग्दर्शक यांच्या जंजीर चित्रपटासह सहा गाजलेले चित्रपट बेकायदा प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात त्यांच्यावर ही कारवाई केली. वर्मा यांच्याव्यतिरिक्त या वाहिनीचे संचालक दर्शन सिंग आणि विश्वजीत शर्मा यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
महामूव्हीज, बॉक्स सिनेमा, फक्त मराठी आणि रिपब्लिक टीव्हीसारखे काही चॅनल्स गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. अशात, नुकताच महामूव्हीविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात कॉपीराइट्सचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढे तपासासाठी हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. यात निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांची परवानगी न घेता महामूव्हीने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जन्मदिन सप्ताहानिमित्त मेहरा यांच्या ‘जंजीर’, ‘लावारीस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘महोब्बत के दुश्मन’, ‘जिंदगी एक जुवा’, ‘जादुगर’ हे सहा चित्रपट प्रसारित केले. तसेच आरोपीने सादर केलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे समोर आले. प्रत्यक्षात हे चित्रपटांचे हक्क विकत घेण्याबाबत आणि चित्रपट प्रसारित करण्याच्या परवानगीबाबत केलेले करारनामे बनावट असल्याचे तपासातून समाेर आले. हे करारनामे विविध बनावट कंपन्यांसोबत करण्यात आले आहेत. याबाबत सीआययूचे पथक अधिक तपास करत आहे.
....................