मुंबई : ‘भारतनेट’च्या धर्तीवर राज्यात ‘महानेट’ योजनेतून, ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १४ हजार ग्रामपंचायती फायबर आॅप्टिक्सने जोडण्यात आल्या असून, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘महानेट’चे काम होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘डिजिटल प्रशासन’ या विषयावर भाष्य केले. डिजिटल प्रशासनाबाबत राज्यभरातून आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरे दिली. डिजिटायझेशनच्या माध्यमातून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचे आणि त्यात पारदर्शीपणा आणण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटली साक्षर करण्यासाठी, केंद्र सरकारने ‘भारतनेट’ हे अभियान सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘महानेट’ योजना सुरू केली आहे. याद्वारे आतापर्यंत १४ हजार ग्रामपंचायती फायबर आॅप्टिक्सने जोडल्याची माहिती त्यांनी दिली. चार हजार कोटींच्या या योजनेसाठी राज्य सरकार १२०० कोटी देणार असून, उर्वरित २८०० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेततळ्यांचे जिओ टॅगिंग केल्यामुळे कामाची तपासणी करता येते. शिवाय शेततळ्याचे पैसे थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. या वर्षी शेततळ्यांसाठी एकूण २ लाख ८३ हजार ६२० अर्ज आले. त्यापैकी ५१ हजार ३६९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, त्यासाठीचे २०४ कोटी रुपये शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.>गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढले‘सीसीटीएनएस’ प्रणालीद्वारे सर्व पोलीस ठाणी एकमेकांशी जोडण्यात आली असून, गुन्हेगारांची माहिती सर्वच पोलीस ठाण्यांसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे सोपे झाले आहे.अशी प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यापूर्वी शंभरपैकी नऊ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा व्हायची, आता मात्र गुन्हे सिद्धीचे प्रमाण ५२ टक्क्यांवर पोहोचले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘भारतनेट’च्या धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायती ‘महानेट’ने जोडणार- फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:20 AM