Join us

महापरिनिर्वाण दिनासाठी लोटला भीमसागर, प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 8:06 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या हजारो अनुयायांसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक संस्था आणि संघटनांनी वैद्यकीय सुविधा आणि भोजन व्यवस्था केलेली आहे.

शिवाजी पार्कवर यंदा अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या कापडी जाळीमुळे अनुयायांची धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे.  मंगळवारपासूनच हजारो अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. बुधवारी सायंकाळीही अनुयायांची रांग मुख्य रस्त्यापर्यंत पोहचली होती. दादर रेल्वे स्थानकाकडून चैत्यभूमीच्या दिशेने येणा-या अनुयायांना भीमसैनिक मार्गदर्शन करत होते. रस्त्याव्लगत बाबासाहेब, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आणि छायाचित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय बुद्धवंदना, संविधान आणि कॅलेंडरच्या प्रती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई मनपाने शिवाजी पार्कवर अनुयायांची चोख व्यवस्था केलेली आहे. मैदानावर अंथरलेल्या हिरव्या चादरीमुळे धुळीच्या त्रासातून अनुयायांची मुक्तता केली. याशिवाय मोबाईल टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लावत अनुयायांची सर्व व्यवस्था मनपाने केली आहे. याशिवाय आॅल इंडिया हिंदूस्तान पेट्रोलियम एससी-एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २५ हजार लोकांची भोजनव्यवस्था करण्यात आली होती. तर बुधवारी सायंकाळी सुमारे ३५ हजार अनुयायांनी भोजनाचा लाभ घेतला. गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत अल्पोपहारासह टोपी व पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फेही शिवाजी पार्क मैदानावर वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राजकीय बॅनरला उतआगामी निवडणुका लक्षात ठेवून विविध राजकीय पक्षांनी चैत्यभूमी परिसरात भरमसाठ बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे चैत्यभूमी परिसर विद्रूप दिसत आहे. अनुयायांना मार्गदर्शक ठरतील असे बॅनर लावण्याऐवजी मतांसाठी लावेलल्या बॅनरबाबत अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मनपाकडून प्रकल्प प्रदर्शनमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे चित्र प्रदर्शन शिवाजी पार्क मैदानात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात मनपाकडून राबवण्यात येणा-या नाट्यगृह, तरण तलाव, उद्यान, उड्डाणपूल आणि विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

लक्षवेधक मूर्तीगौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुबक मूर्ती विक्रीसाठी मैदानात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तांब्याच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. एका स्टॉलवर ठेवण्यात आलेली सात फूट उंच व २७० किलो वजनाची तांब्याची मूर्ती भलतीच भाव खाऊन जात आहे.

टॅग्स :मुंबई