लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मालाडमधील युनिसेक्स सलूनची मालकीण सोनिया शिवलिंगम (३४) हिने तीन जणांना डांबून ठेवून दीड लाखांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक मदतनीस महिला, तिची मुलगी आणि भाचीला ‘सेन्सर लॉक’ खोलीत बंद करून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या निर्भया पथकाने त्यांची सुखरूप सुटका करत आरोपीला अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोनल सोलंकी (३८), तिची मुलगी प्रीती (१८) आणि भाची हेमा यांना आरोपी सोनिया शिवलिंगम हिने सलूनच्या खोलीत बंद केले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रीती ही सात हजार रुपये पगारावर मालाड लिंक रोडवरील चिंचोली बंदरच्या सलूनमध्ये शिवलिंगमसाठी मदतनीस म्हणून काम करत होती. मार्च २०२१ रोजी प्रीतीने शिवलिंगमकडून ५० हजार रुपये आगाऊ घेतले होते. तिने सप्टेंबरपर्यंत पगारातून थोडेथोडे कापत शिवलिंगमला २७ हजार रुपये परत केले. दरम्यान, काही कामानिमित्त शिवलिंगमने प्रीतीचा मोबाईल घेतला. प्रीतीने फोन परत मागितला तेव्हा उरलेले पैसे दिलेस की मोबाईल परत करते, असे तिने प्रीतीला सांगितले.
त्यानंतर तिची आई सोनल आणि भाची हेमा २० हजार रुपये परत करण्यासाठी सलूनमध्ये गेल्या. रक्कम स्वीकारल्यानंतर शिवलिंगमने सांगितले की, प्रीतीने सलूनमध्ये दीड लाख रुपये किमतीची फुलदाणी तोडली होती. त्याचेही पैसे परत करा. दरम्यान, त्यांनी विरोध केल्यानंतर शिवलिंगमने सोनल, हेमा आणि प्रीतीला सेन्सर लॉक सिस्टीम असलेल्या खोलीत कोंडले. त्यांनी विनवण्या केल्यावर शिवलिंगमने सोनलला बंद करत अन्य दोघींना पैसे आणण्यास पाठविले. त्यानंतर या दोघींनी थेट मालाड पोलिसांच्या निर्भया पथकाशी संपर्क साधला आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत सोनलची सुटका करत शिवलिंगमला अटक केली.