महाराजांच्या विचारांचे पाईक व्हावे!
By admin | Published: June 27, 2015 10:46 PM2015-06-27T22:46:21+5:302015-06-27T22:46:21+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा अनुनय म्हणजेच त्यांना खरी आदरांजली असून सर्वांनी त्यांच्या विचारांचे पाईक होण्याचा प्रयत्न करावा,
अलिबाग : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा अनुनय म्हणजेच त्यांना खरी आदरांजली असून सर्वांनी त्यांच्या विचारांचे पाईक होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शुक्रवारी येथे केले. समाज कल्याण विभाग अलिबागच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित राजर्षी शाहू महाराजांच्या १४१व्या जयंती निमित्त सामाजिक न्यायदिनाच्या कार्यक्र मात त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांसारख्या समाज घडवणाऱ्या थोर मंडळींनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण आपल्या वाट्याला आलेले कार्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडले तर तीच खरी श्रद्धांजली ठरेल. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून या विभूतींनी रंजल्या-गांजल्यांसाठी प्रगतीचा मोठा मार्ग व प्रकाश दाखवून दिलेला आहे. त्याचे अनुकरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक न्यायदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक सत्कार यावेळी करण्यात आला. सर्वसाधारण विद्यार्थ्यांतून दहावीत प्रथम आलेले मागासवर्गीय विद्यार्थी नीलाक्षी सकपाळ (८८ टक्के गुण), सृष्टी साखरकर (७६ टक्के गुण) यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गातील विद्यार्थिंनी स्मिता झोरे (इयत्ता ९ वी), सुचिता गोरे या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्र माला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागूल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे आदी उपस्थित होते.