Join us

12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 10:16 AM

राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे

मुंबई - ठाकरे सरकारची 10 रुपयातील थाळी योजना हसू ठरते की काय असंच दिसून येत आहे. कारण, राज्य सरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला असून 10 रुपयात ही थाळी नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या थाळींची संख्या मर्यादीत असल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण, साधारण 2 कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मुंबईला फक्त 450 थाळ्या देण्यात आल्या आहेत. 

राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात केवळ 18000 थाळ्या दरदिवसाला वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे, 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 18,000 थाळ्या कशा पुरतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेत मुंबई शहर आणि उपनगरसाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला सर्वात कमी 150 थाळ्या देण्यात आल्या आहेत.

शिवभोजन योजनेत थाळ्यांसह त्यातील जेवणाच्या प्रमाणावरही बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार, 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि भात मिळणार आहे आणि ते ही दुपारी 12 ते 2 या दोन तासातच हे जेवण मिळेल. गोरगरीबांना 10 रुपयांत भोजन मिळण्याची व्यवस्था करणाऱ्या शिवभोजन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यांसाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद मंत्रिमंडळाकडून करण्यात आली. राज्यात सत्ता आल्यास भुकेल्यांना 10 रुपयांत भोजन देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समारोपाच्या भाषणात इतर मोठ्या घोषणांप्रमाणेच 10 रुपयांत भोजन देण्याचीही घोषणा केली होती. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईमहाराष्ट्र