Join us

८१ अवयवदात्यांमुळे २१३ जणांना मिळाली नवसंजीवनी; मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधून अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:18 AM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिना अवयवदान महिना म्हणून घोषित केला आहे.

मुंबई :  गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८१ मेंदुमृत दात्यांच्या नातेवाइकांनी संमती दिल्यामुळे २१३ जणांना नवे जीवदान मिळाले आहे. गेल्यावर्षी वर्षभरात राज्यातून १४९ अवयवदात्यांनी अवयवदान केले होते. त्यामुळे यावर्षी हा आकडा वाढविण्यासाठी शासकीय, सामाजिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिना अवयवदान महिना म्हणून घोषित केला आहे.

गेल्या सहा महिन्यांत राज्यातील विविध रुग्णालयांत डॉक्टरांनी १४४ रुग्णांना मेंदुमृत म्हणून घोषित केले होते. त्यापैकी ८१ मेंदुमृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला होता. यामध्ये १२४ किडनी, ६७ लिव्हर, ११ फुप्फुस, १० हृदय, १ स्वादुपिंड दान करण्यात आले. त्यामुळे राज्यभरात अवयवांसाठी प्रतीक्षा यादीवर असलेल्या २१३ नागरिकांना नवजीवन मिळाले आहे.

अनेकदा सर्वच अवयव घेतले जात नाहीत 

एक मेंदुमृत व्यक्ती ७ ते ८ अवयवदान करू शकते. मात्र प्रत्येक अवयवदात्याचे सर्वच अवयव मिळतात असे नाही. काही अवयवदात्यांकडून दोन ते तीन किंवा ५ ते ७ अवयव मिळतात. अनेकवेळा वैद्यकीय कारणांमुळे सर्वच अवयव घेतले जात नाही. 

चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या 

राज्यात अवयवदान आणि प्रत्यारोपण नियमन करण्यासाठी, अवयवनिहाय प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या आहेत. या  समित्या मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे आहेत. मुंबई आणि नागपूरमध्ये प्रत्येकी २४ मेंदुमृत अवयवदात्यांनी, पुण्यामध्ये ३२ आणि  छत्रपती संभाजीनगर येथे एकाने अवयवदान केले. राज्यात अवयवदानाची जनजागृती व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यस्तरावरील  राज्य अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्था (सोटो) मेहनत घेत आहेत. नागरिकांनी नोटोच्या वेबसाइटवर अवयवदानाचे अर्ज भरावेत, असे आवाहन केले आहे.   

राज्यातील अवयवनिहाय रुग्णांची प्रतीक्षा यादी (मार्चपर्यंत२०२४) 

किडनी ६,४१५ यकृत १,४८९ हृदय ११९ फुप्फुस ५६ स्वादुपिंड ३४  

टॅग्स :मुंबईअवयव दानआरोग्य