Join us

महाराष्ट्र  @ ४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 7:21 PM

सोलापूर आणि परभणी येथील कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आहे.

मुंबई : मुंबई वगळता राज्यातील उर्वरित शहरांचे कमाल तापमान चांगलेच चढे नोंदविण्यात येत आहे. सोलापूर आणि परभणी येथील कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले तरीदेखील मुंबईकरांना ऊन्हाचे चटके मात्र चांगलेच बसत आहेत. एकीकडे कमाल तापमानात वाढ  नोंदविण्यात येत असतानाच राज्यातील काही ठिकाणांना देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. परिणामी राज्यात दुहेरी वातावरण असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

राज्याच्या दक्षिणी भागात वातावरण ढगाळ नोंदविण्यात येत आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावादेखील होत आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड जिल्हयास यापूर्वीच वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनादेखील यापूर्वी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. विदर्भात तुरळक ठिकाणांना यापूर्वी पावसाचा इशारा देण्यात आला होता. इशा-यानुसार, बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस हजेरी लावत असतानाच दुसरीकडे कमाल तापमानदेखील अधिकाधिक नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर आणि मालेगावसारख्या शहरांचे कमाल तापमान ४० आणि ४१ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. 

गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे  होते. ८ एप्रिल रोजी विदर्भात पाऊ स पडेल. १० आणि ११ एप्रिल रोजी विदर्भात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ८ एप्रिल रोजी मात्र मुंबई ढगाळ राहील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  

 

टॅग्स :तापमानहवामान