मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात घोडेबाजार शब्दावरून जोरदार जुगलबंदी झाली.
विधानसभेमध्ये मांडण्यात आलेल्या अध्यक्षांची निवड आवाजी मतदाराने करण्याच्या प्रस्तावावर बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, पक्षांतर बंदी कायदा हा घोडेबाजार बंद व्हावा म्हणून निर्णय घेतला होता. आता घोडेबाजार म्हटल्याने विरोधकांना त्रास का होतोय, असा टोला यावेळी नाना पटोले यांनी लगावला होता. त्याला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सभागृहातील आमदारांचा घोडेबाजार म्हणून अपमान केला आहे. घोडेबाजार करायला हा काय घोड्यांचा तबेला आहे का. तुम्ही आमदारांचा अपमान करता, हे आमदार काय विकाऊ आहेत. तुम्ही आमदारांचा घोडेबाजार म्हणून अपमान करायचा आणि ठोक घोडेबाजार झाला की तो मान्य करायचा. आम्ही मरून जाऊ पण आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही. तुम्हाला दहा वर्षे भाजपामध्ये चांगले संस्कार दिले, त्याचा उपयोग करा, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी नियम बदलण्याची गरज नव्हती. अध्यक्षांबाबत विरोधी पक्षांशी बोलून एकमत करता आलं असतं. त्यामुळे हा प्रस्ताव रेटायचा असेल तर मतदान करून प्रस्ताव रेटा, असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी गमतीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही एक कोपरखळी मारली. ते म्हणाले की., यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागते. या सरकारला धैर्य नाही का. दुसरी बाब म्हणजे, तुम्ही सांगितलं की, मागे तुम्हीच सांगितलं होतं की तुम्हाला डाव्या कानाने ऐकू येत नाही. मग आवाजी मतदान घेतलं तर डाव्या बाजूचा आवाज तुम्हाला ऐकू येईल का, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घ्या, दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.