मुंबई - गेल्या महिनाभरापासून उत्सुकता लागलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर बुधवारी पार पडला. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटानेही मोठं शक्तीप्रदर्शन करत शिवसैनिकांची साथ आमच्यासोबतच असल्याचे सांगितले. मात्र, अद्यापही खरी शिवसेना कोणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच आहे. तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा वारसदार कोण, याची चर्चा रंगली. तर, दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदेंच्या या ट्विटवर गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी प्रतिक्रियाही दिली.
अमृता फडणवीस यांनी दोन्ही मेळावे ऐकणार असल्याचं म्हटलं होतं. पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं हे ऐकणं गरजेचं असतं. त्यामुळे, मी दोघांच्याही मेळाव्यातील भाषण ऐकणार आहे. मात्र माझे फेव्हरेट एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे झिंदाबाद... असे म्हणत शिंदेंच्याच दसरा मेळाव्याला गर्दी होईल, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले होते. त्यातच, दसरा मेळाव्यातील भाषण सुरू होण्यापूर्वीच शिंदेच्या ट्विटला रिट्वीट करत याच बदलाची महाराष्ट्राला आणि देशाला गरज असल्याचंही अमृता यांनी सांगितलं.
दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ", या कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी लिहिल्या. तसेच विचारांचे वारसदार असंही म्हटलं. अमृता फडणवीस यांनी हे ट्विट रिट्विट करत, ''याच बदलाची महाराष्ट्राला आणि देशाला गरज'' असल्याचे सांगितले.