आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:27 IST2025-03-05T09:26:18+5:302025-03-05T09:27:19+5:30
Maharashtra Assembly Budget Session 2025: आझमींना टार्गेट करून मुंडे, कोकाटेंना एका दिवसापुरता का होईना बाय देण्याची, तर खेळी नव्हती ना, असा प्रश्न पडल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी
Maharashtra Assembly Budget Session 2025: विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधकांनी लावून धरलेल्या मागणीला यश आले आणि अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, आझमींच्या निलंबनाची मागणी करत सत्ताधारी पक्ष आक्रमक झाल्याने धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा लावत गदारोळ करण्याची संधी विरोधकांनी गमावल्याची चर्चा सुरू आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आवाज उठवला. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी वाल्मीक कराडला बेड्या ठोकल्या. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. नागपूर अधिवेशनात मुंडेंच्या राजीनाम्याचा उपस्थित झालेला मुद्दा मुंबईतील अधिवेशनात निकाली निघाला.
प्रकरण आझमींचे फायदा मुंडे यांचा
औरंगजेबाचे कोडकौतुक करणारे अबू आझमी हे मंगळवारी सभागृहात सत्तापक्षाचे टार्गेट होते. स्व:त आझमी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. मात्र, सत्तारूढ सदस्यांनी जोरदार हंगामा करत त्यांच्या निलंबनाची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणा देत मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी मुंडे यांनी राजीनामा दिला आहे आणि आपण तो स्वीकारून राज्यपालांकडे पाठविला असल्याचे पत्रकारांना सांगितले. विधानसभा आणि विधान परिषदेतही अबू आझमींचे प्रकरण लावून धरले गेल्याने मुंडे, कोकाटेंवरून गदारोळाची संधी विरोधकांना मिळालीच नाही. आझमींना टार्गेट करून मुंडे, कोकाटेंना आजच्या दिवसापुरता का होईना बाय देण्याची, तर सत्तापक्षाची खेळी नव्हती ना, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. मुंडे विधानभवनाकडे फिरकलेच नाहीत, कोकाटे आले अन् त्यांना पत्रकारांनी घेरले, उद्या नाशिकच्या कोर्टात त्यांच्या
शिक्षेला स्थगिती मिळाली, तर ते वाचतील, नाहीतर घरी जावे लागेल असे दिसते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला’, अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही नैतिकतेला धरूनच मुंडे यांनी राजीनमा दिल्याचे म्हटले.