माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:22 PM2024-10-23T15:22:46+5:302024-10-23T15:28:04+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वाचं लक्ष वेधलं गेलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाकडून विभागप्रमुख महेश सावंत यांना माहिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वाचं लक्ष वेधलं गेलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. माहिममध्ये अमित ठाकरेंविरोधात शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटानेही येथील आपला उमेदवार निश्चित केला आहे. ठाकरे गटाकडून विभागप्रमुख महेश सावंत यांना माहिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर माहिम विधानसभा मतदारसंघातून महेश सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता माहिममध्ये मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महेश सावंत यांनी सांगितले की, हे पाहा कितीही जणांचं आव्हान असेल तरी जनतेला रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार भेटला आहे. त्यामुळे आम्हाला समोर कुणाचं आव्हान आहे, असं वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे. त्याच पद्धतीने काम होणार आहे आणि शेवटी विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार आहे, असे महेश सावंत यांनी सांगितले.
माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या तीन निवडणुकांपासून शिवसेना विरुद्ध मनसे अशीच मुख्य लढत झालेली आहे. त्यात २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई हे विजयी झाले होते. तर २०१४ आणि २०१९ मध्ये सदा सरवणकर यांनी बाजी मारली होती. मात्र यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे अशी तिरंगी लढत रंगणार असल्याने येथील सामना लक्षवेधी आणि चुरशीचा होण्याची शक्यता आहे.