विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतीलवरळी विधानसभा मतदारसंघात यावेळी अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देत तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही येथून बलाढ्य उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे वरळीमधील चुरच वाढण्याची शक्यता आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून संमिश्र मतदारवर्ग असलेल्या वरळीमधून खासदार मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाणार हे आता निश्चित झाले आहे. सुरुवातीला येथे महायुतीकडून मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर वरळीमधून भाजपाच्या महिला नेत्या शायना एनसी यांचं नाव समोर आलं होतं. मात्र आता मिलिंद देवरा यांचं नाव वरळीमधून आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. मिलिंद देवरा यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते.
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या वृत्ताला सोशल मीडियावरून दुजोरा दिला आहे. वरळी आणि वरळीकरांना दीर्घकाळापासून न्याय मिळत नव्हता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मत आहे. आता आम्ही एकत्रितपणे पुढे जाणार असून, विकासाबाबतचा आमचा दृष्टीकोन समोर मांडणार आहोत, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा ६७ हजार ४२७ मतांनी पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळीमध्ये महाविकास आघाडीला जेमतेम ६ हजार ४०३ मतांचीच आघाडी मिळाली होती. ही बाब ठाकरे गटाची चिंता वाढवणारी आहे. त्यात आता मुंबईतील मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाचं राजकारण करणारे तीन पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे.