शिवसेनेतल्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "अयोध्येवरुनच त्यांचा प्लॅन होता की..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:54 PM2024-11-09T13:54:56+5:302024-11-09T13:56:45+5:30
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निकालापासून राज्यात अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी घडत राहिल्या. त्यानंतर २२ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेमध्ये बंड केलं आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला. मात्र आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाबाबत गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्येवरुनच पळून जाण्याची योजना होती असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना या सगळ्या गोष्टी माहिती असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी बऱ्याच आधीपासून तयारी सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
"ही फक्त २०२२ ची गोष्ट नाही. जवळपास २०२१ पासून गोष्ट सुरू झाली. एकाच वेळी दोन गोष्टी सुरू होत्या. एकीकडे माझ्या वडिलांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यांना जास्त हात पाय हलवता येत नव्हते. त्याच दरम्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या दोघा तिघांवर ईडीने कारवाई केली होती. एकनाथ शिंदे यांनाही सांगितलं होतं की तुम्ही जर सोबत आलं नाही तर तुम्हालाही आत जावं लागेल. पक्षप्रमुख दवाखान्यात असल्याने आमचं भविष्य काय या विचाराने त्यांनी एकेकाला विकत घ्यायला सुरुवात केली होती. या गोष्टी आमच्या कानावर येत होत्या. मे महिन्यापर्यंत त्यांच्या मनात काय आहे हे जवळपास कळलं होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"२० मे रोजी मी दावोसमध्ये असताना एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का. कारण तुम्ही जे करताय ते आमच्या कानावर येतंय आणि जर असं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण पक्षासोबत गद्दारी करू नका. त्यानंतर एकनाथ शिंदे रडायला लागले आणि म्हणाले माझं तुरुंगात जाण्याचे वय नाही. मी भाजपला खोटं सांगत आहे की मी त्यांच्याकडे येणार आहे. पण हे खरं नाहीये. १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी प्रयत्न केले आणि आमचा एक उमेदवार पडला. त्यानंतर १५ जूनला माझ्यासोबत ते अयोध्येला आले. तेव्हाच त्यांची योजना होती की तिथून पळून जायचे. सगळी तयारी झाली होती कोण कुठल्या विमानात बसणार याची तयारी झाली होती. पण हे सगळं आम्हाला कळलं होतं," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
"१९ जून रोजी आमच्या पक्षाची स्थापना दिवस असतो आणि २० जून रोजी विधान परिषद आमदारांसाठी मतदान होते. विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांसाठी आम्ही शेवटच्या वेळी कोटा बदलला आणि आमचे आमदार जिंकले. पण मतमोजणी सुरू असतानाच ते पळून गेले. पहिल्यांदा आम्हाला वाटले यांच्यासोबत बारा लोक आहेत. दिवस जास्तीत जास्त पुढे गेले तसे अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते. दोन-तीन जणांनी तर आम्हाला सांगितलं पण की आम्हाला प्रकरण आम्हाला अटक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्हाला जाऊ द्या," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.