माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:47 PM2024-11-17T18:47:29+5:302024-11-17T18:48:53+5:30
या विभागात जेवढे समाज आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला असून त्यांनी समाजाच्या बैठका घेऊन महेश सावंत आपला आहे, त्याला पाठिंबा दिला आहे असं सांगितले.
मुंबई - आज मी घरोघरी जातोय, बाकीचे दोन्ही उमेदवार घरी जात नाहीत. मी घरात जातो, समस्या जाणून घेतो. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या, खेळाडूच्या समस्या मी जाणून घेतो. त्यामुळे मला प्रश्नांची जाण आहे. आज मतदारसंघातील सर्व समाजातील लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. मुस्लीम समाज, कॅथलिक समाजानेही पाठिंबा दिला आहे असं सांगत माहिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी विजयाचा विश्वास दाखवला.
माध्यमांशी संवाद साधताना महेश सावंत म्हणाले की, आम्ही घरोघरी लोकांचे आशीर्वाद घेत आहोत. बहुतांश समाज बांधव आमच्या पाठीशी आहेत. सोनार समाजाने आमच्यासाठी बैठक घेऊन पाठिंबा दर्शवला. कुंभार समाजाने पाठिंबा दिला. मराठी समाज, भंडारी समाज, कोळी बांधव यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. आमच्या मतदारसंघातील कॅथलिक समाज, मुस्लिम समाजानेही मला पाठिंबा दिला आहे. या विभागात जेवढे समाज आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला असून त्यांनी समाजाच्या बैठका घेऊन महेश सावंत आपला आहे, त्याला पाठिंबा दिला आहे. आजपर्यंत मी पक्ष बघितला नाही, जात धर्म पाहिला नाही जो माझ्याकडे समस्या घेऊन येतो, मग तो रात्री अपरात्री, दिवसा किंवा संध्याकाळी असू दे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक समाज माझ्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच भलेही सदा सरवणकर ३ वेळा आमदार असतील तरी त्यांना निवडून आणणारे शिवसैनिकच होते. आज ते निवडून आलेत, नगरसेवक आमदार झालेत हे शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेत. आज त्यांच्याकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली आहे, सामान्य नागरिकांनी पाठ फिरवली आहे. म्हणून त्यांना खूप कष्ट करावे लागतायेत. स्वत:ची प्रतिमा इतकी खालावून ठेवली आहे लोक त्यांना सहकार्य करत नाहीत असा टोला महेश सावंत यांनी सदा सरवणकरांना लगावला.
दरम्यान, आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, १७ नोव्हेंबर आमच्यासाठी काळा दिवस आहे कारण बाळासाहेबांचं देहावसान झालं पण बाळासाहेब हे आमच्या हृदयात कोरले आहेत. मी इथेच असल्याने रोज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आमच्या दिवसाची सुरूवात होते. सकाळी ७ वाजता मी शिवाजी पार्कमध्ये हजर असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी ३६५ दिवस स्मृती दिन आहे असंही महेश सावंत म्हणाले.