Join us

"बाळासाहेबांचे इच्छापत्र मीच एक्झिक्युट केल्याने मला माहितीय..."; राज ठाकरेंच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 6:20 PM

ठाण्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Anil Parab  Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यात पहिली जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.  ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकी संदर्भावरूनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेवर टीका केली. शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.  शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सांभाळा असं सांगितले होते, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

"बाळासाहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो आमचा नेता आम्ही समजतो. बाळासाहेबांनी दसऱ्याच्या सभेत आम्हाला सगळ्यांना सांगितले की, उद्धव आणि आदित्यला सांभाळा. जेव्हा एखादा ज्येष्ठ नेता आपली धुरा दुसऱ्याकडे सोपवतो तेव्हा ती प्रॉपर्टीसकट सोपवतो. बाळासाहेबांचे इच्छापत्र मीच एक्झिक्युट केले असल्यामुळे मला बाळासाहेबांनी काय काय लिहिलं आहे आणि कोणाला अधिकार दिले हे सगळ्यात जास्त मलाच माहित आहे," असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

तुमची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार का? किशोरी पेडणेकर

"शिवसेनेची निशाणी काही जणांना टोचायला लागली आहे. त्यामुळे काही नेत्यांनी काल भाषण केलं. धनुष्यबाण एकनाथ शिंदेंची निशाणी नाही. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचेच आहे. त्यात सांगायची काय गरज आहे. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेचे याचे हक्कदार होऊ शकतात. निशाणी जर तुम्हाला प्रॉपर्टी वाटत असेल तर तुमची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार आहात का? किंवा तुमच्या घरातील नोकराला देणार आहात का?, अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकराज ठाकरेअनिल परबउद्धव ठाकरे