Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यानंतर मुंबईत सभा घेतली आहे. उत्तर मुंबईमध्ये मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, योगेश सागर, विनोद शेलार, प्रकाश सुर्वे या महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाह यांनी बोरिवली येथे सभा घेतली. या सभेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयलसुद्धा उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी कलम ३७० च्या मुद्द्यासह राम मंदिराच्या मुद्द्यापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम भाजप करणार असल्याचे अमित शाह यांनी म्हटलं.
भाजपने एक एक करून सगळी आश्वासनं पूर्ण केली
"मल्लिकार्जुन खरगे तुमचा पक्षही तुमचेही ऐकत नाही. महाविकास आघाडीने जी आश्वासनं दिली आहेत ती महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार नाहीत. भाजपने एक एक करून सगळी आश्वासनं पूर्ण केली आहेत. २०१९ मध्ये तुम्ही मोदींना पुन्हा पंतप्रधान केलं आणि त्यांनी कलम ३७० हटवलं. काश्मीरला कायमस्वरूपी भारतासोबत जोडण्याचे काम केले. राहुल गांधीच काय त्यांची चौथी पिढी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू केले जाणार नाही. सगळा देश काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानतो. नुकतेच सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले की मी गृहमंत्री होतो तेव्हा काश्मीरला जाताना भीती वाटायची. शिंदे साहेब तुम्ही गृहमंत्री असून तुम्हाला भीती वाटत होती. मी आता सांगतोय नातवंडांना घेऊन जम्मू-काश्मीरला जा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. बोरिवलीकरांनो तुम्ही सुद्धा कुठे दुसरीकडे फिरायला जाऊ नका जम्मू-काश्मीरला शिकारामध्ये फिरुन या आणि मोदीजींची आठवण काढा," असं अमित शाह यांनी म्हटलं.
हे भाजपाचे सरकार आहे जे बोलतो ते करतो
"२०१९ मध्ये तुम्ही नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं आणि त्यांनी पाचच वर्षात ते प्रकरण सुद्धा जिंकलं, भूमिपूजन सुद्धा केलं, मंदिराची उभारणी सुद्धा केली आणि प्राणप्रतिष्ठा करून जय श्रीराम सुद्धा करून टाकले. साडेपाचशे वर्षानंतर राम लल्लाने पहिल्यांदा दीपावली आपल्या मंदिरात साजरी केली. औरंगजेबाने तोडलेले काशी विश्वनाथचे कॉरिडर सुद्धा आम्ही बनवले. तयार रहा सोमनाथचे मंदिर सुद्धा पुन्हा सोन्याचे बनणार आहे. हे भाजपाचे सरकार आहे जे बोलतो ते करतो," असंही अमित शाह म्हणाले.
दोन वर्षात कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असणार
"२२ किलोमीटर लांब अशा ट्रान्स हार्बर लिंकचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काही वर्षात सुरू होणार आहे. १४ हजार कोटींच्या मुंबई कोस्टल रोडचे ८७ टक्के काम झाले आहे. दोन वर्षात कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आठ तासांचे अंतर वाचवण्याचे काम समृद्धी महामार्गाने केले आहे. उद्धव ठाकरेंना विमानात बसवण्यास भीती वाटत असेल आणि त्यांना नागपूरला जायचं असेल तर समृद्धी महामार्गाने जा लवकर पोहोचाल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच पूर्ण होणार आहे. ३००० कोटींचा नवी मुंबई मेट्रो प्रकल्पसुद्धा पुढे जात आहे. धारावीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना एक चांगलं घर मिळणार आहे. या योजनेमुळे सगळ्या मुंबईची किंमत वाढणार आहे. मुंबईला जगातल्या प्रमुख शहरांच्या यादीत बसवण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. मी आज सांगून जात आहे मुंबईकरांनो माझा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वेचून वेचून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे," असं आश्वासन अमित शाहांनी दिलं.
२३ तारखेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार
"मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की उद्धवजी तुम्ही सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाणार आहात. कधी रात्री बाळासाहेबांचे स्मरण करून त्यांचे सिद्धांत काय सांगत होते याचा विचार करा आणि आता तुम्ही कुठे आहात हे पहा. राहुल गांधी नावाचे विमान सोनिया गांधी यांनी वीस वेळा उतरवण्याचे प्रयत्न केले. पण ते वीस वेळा क्रॅश झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सहाय्याने ते पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करत आहेत. पण सोनियाजी लक्षात ठेवा २१व्या वेळी राहुल गांधी नावाचे विमान क्रॅश होणार आहे. २३ तारखेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे," असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.