सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:29 AM2024-11-08T10:29:08+5:302024-11-08T10:56:50+5:30
माहिम मतदारसंघात सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे.
मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात महायुतीचे सदा सरवणकर, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे महेश सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा ही भाजपाची भूमिका आहे असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केले होते. मात्र सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे. फडणवीसांसोबतच भाजपाचे आशिष शेलार, प्रसाद लाड यांनीही अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यात आता माहिममधील भाजपा कुणाच्या बाजूने असणार हा संभ्रम निर्माण झाला आहे.
गुरुवारी महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वृषाली श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित राहणार असे पोस्टर झळकले होते. मात्र या कार्यक्रमाला आशिष शेलार यांनी दांडी मारल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सदा सरवणकरांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन वृषाली शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.
याबाबत सदा सरवणकर म्हणाले की, आमचा कार्यक्रम हा बुधवारी सकाळी निश्चित केला, आशिष शेलारांना फोन केला तेव्हा त्यांनी वेळ बघून मी निश्चित येण्याचा प्रयत्न करतो. सकाळी मला त्यांचा फोन आला, वेळेचं जमत नाही. तेदेखील एक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांची अडचण करण्याची भावना नव्हती. महायुतीचे उमेदवार म्हणून ते आमच्या पाठीशी आहेत. झेंडे दिसतात ते आमचे ४० वर्षांची मैत्री आहे. वैयक्तिक संबंध हे आमचेही राजसाहेबांसोबत आहेत. राजसाहेब आपल्यातले एक आहेत, अशी भावना होती. पण ही लढाई आहे. महायुतीचे कार्यकर्ते या मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण विधानसभेत पाठवतील असा विश्वास सरवणकरांनी व्यक्त केला.
दरम्यान, सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. उद्या किंवा परवा आशिष शेलार आमच्या रॅलीत येतील. कार्यकर्त्यांना तसं सांगितले आहे. आज माझं नाव तुम्ही दिलं आहे मात्र मी आलो नाही म्हणून गैरसमज होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांगा, उद्या किंवा परवाच्या रॅलीत मी निश्चित असेन असा निरोप आशिष शेलारांनी दिल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.