Join us  

विधानसभा निवडणुकीसाठी ‘संघ’ दक्ष; भाजपा-RSS बैठकीत काय ठरले? मुंबईबाबत महत्त्वाचा निर्णय! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 4:52 PM

RSS-BJP Meet On Maharashtra Assembly Election 2024: भाजपाने संघासमोर शरणागती पत्करली असून, विधानसभा जिंकण्यासाठी आता RSSही मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

RSS-BJP Meet On Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील, तसेच मतदान आणि निकाल नोव्हेंबरमध्ये लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्याचे दिसले. हेच चित्र आता विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू नये, यासाठी भाजपा कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची एक बैठक झाल्याची माहिती आहे. 

लोकसभेतील हाराकिरीमुळे भाजपाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेण्यात पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपाला मोठा फटका बसला. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव जाणवला होता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये संघाला सोबत घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संघ आणि भाजपा आमदारांच्या झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

भाजपा-RSS बैठकीत काय ठरले? मुंबईबाबत महत्त्वाचा निर्णय! 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आमदारांची बैठक नुकतीच झाली. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार असल्याचे समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईत ३६ मतदार संघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजपा मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

विधानसभा जिंकण्यासाठी भाजपासह संघही मैदानात

लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती. मात्र, विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये संघाने भाजपाला एक हाती मदत केली होती. याच मदतीच्या जोरावर भाजपाच्या नगरसेवकांचा आकडा ३१ वरून ८२ पर्यंत वाढला होता. संघाच्या मदतीमुळे भाजपाला मुंबईत २०१९च्या लोकसभेमध्ये ३ तर महायुतीला ६ जागांवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपाने एकट्याच्या जीवावर १६ जागा जिंकल्या होत्या.

उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही

उर्दू भवनच्या मुद्द्यावरून विरोध असताना मुंबईत यामिनी जाधव यांना उमेदवारीमुळे दिली. त्यामुळे संघात मोठी नाराजी होती. याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत संघाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला मुंबईत केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत मुंबईत ३ पैकी २ हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपाने संघासमोर शरणागती पत्करली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. परंतु, असे असले तरी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, याचीही खात्री संघाने भाजपाला दिल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संघाच्या मदतीचा भाजपाला विधानसभा निवडणुकीत नेमका काय फायदा होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४भाजपाराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहायुती