Join us

वरळीत चुरस वाढणार, भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:37 PM

Maharashtra Assembly Election 2024: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत वरळीणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळाली नसल्याने विरोधकांना आणखीनच बळ आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामध्येच मुख्य लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत वरळीणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळाली नसल्याने विरोधकांना आणखीनच बळ आलं आहे. एकीकडे मनसेकडून संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे आता भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या शायना एनसी (Shaina NC) यासुद्धा वरळीमधून लढण्यास इच्छूक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शायना एनसी या भाजपाच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय असून, उच्चभ्रू मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शायना एनसी यांचं नाव पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असा भाजपाचा अंदाज आहे. तसेच शायना एनसी यांचे वडी नाना चुडासमा यांचाही मुंबई शहरावर प्रभाव राहिला होता. तसेच नाना चुडासमा यांनी मुंबईचे नगरपाल म्हणूनही काम पाहिले होते.

आदित्य ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश माने यांचा तब्बल ६७ हजार ४२७ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी शिवसेना भाजपासोबत महायुतीमध्ये होती. तसेच मनसेनेही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी या मतदारसंघातील चित्र काहीसं बदललेलं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अवघं ६ हजार ४०३ मतांचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथे ठाकरे गट आणि आदित्य ठाकरें समोरील आव्हान वाढलेलं दिसत आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४वरळीआदित्य ठाकरेभाजपा