मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:47 PM2024-11-06T18:47:01+5:302024-11-06T18:47:15+5:30
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. मुंबईत २० नोव्हेंबर रोजी कामगारांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या संस्थाविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मुंबईत बुधवार, २० नोव्हेंबर रोजी अनिवार्य सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रक काढून ही घोषणा केली. मतदानाच्या दिवशी सुट्टीसाठी पगार कपातीची परवानगी नसणार आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या संस्थाच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे.
"सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन्स, उपक्रम संस्था, औद्योगिक गट, व्यापारी इतर सर्व आस्थापने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा देणे बंधनकारक आहे," असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यासोबत अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची रजा मंजूर करणे शक्य नसेल, तर कर्मचाऱ्यांना किमान चार तासांची सूट दिली जाऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईतील पात्र मतदारांना बाहेर पडण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता निवडणूक असलेल्या मतदान क्षेत्रामध्ये कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये असलेल्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे.
तसेच या रजेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्याची परवानगी नसणार आहे. कोणत्याही संस्थेने या नियमांचे किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. कलम १३५ (ब) नुसार लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ नुसार निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन न केल्यास मालकावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.