मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 07:56 AM2024-11-13T07:56:48+5:302024-11-13T07:58:02+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

Maharashtra Assembly Election 2024 : clash between eknath shinde and uddhav thackeray party workers in jogeshwari and andheri shiv sena vs shiv sena , mumbai | मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!

मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी आणि अंधेरी येथे जोरदार राडा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री  तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचे वृत्त मतदारसंघात पसरले होते. त्यामुळे जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारायला गेले होते. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक झाली. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला.

हा सगळा गोंधळ सुरु असताना याठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे. तसेच, बाळा नर यांना देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मातोश्री क्लबमध्ये साडेतीनशे जणांचा जमाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी  निवडणूक फ्लाईंग स्क्वाड आणि पोलिसांकडे तक्रार करत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत. मध्यरात्री साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास गावदेवी डोंगर परिसरात मतदारांना भेटवस्तू वाटण्यासाठी हा ट्रक आला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला. या घटनेमुळे मुंबईमध्ये मध्यरात्री वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.

मातोश्री क्लबवर गुंड, त्यांच्यावर कारवाई व्हावी - अनिल परब
या सगळ्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब याठिकाणी आले होते. त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुंबईत सगळीकडे हेच सुरु आहे. अनेक ठिकाणी पैसेवाटप, धान्यवाटप सुरु आहे. गेले अनेक दिवस मातोश्री क्लबवर पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंड आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : clash between eknath shinde and uddhav thackeray party workers in jogeshwari and andheri shiv sena vs shiv sena , mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.