"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 08:28 PM2024-11-14T20:28:36+5:302024-11-14T20:34:02+5:30

मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in a meeting in Mumbai | "बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख बंद सम्राट म्हणून केला आहे.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या शिवतीर्थावरून विचारांचे सोनं वाटायचे. आज पंतप्रधान मोदी सुद्धा विचारांचे सोने वाटायला आले आहेत. म्हणूनच आजचा दिवस आपल्यासाठी दसऱ्यासारखा आहे आणि आपल्याला २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे फटाके सगळ्यांनी तयार करून ठेवा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण काम करत आहोत म्हणून महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"आम्ही दोन वर्षांपूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सामील झालो. आम्ही जो मार्ग स्वीकारला त्याची फळं आज महाराष्ट्राला मिळत आहेत. आजवर झालं नाही तेवढं काम आम्ही अडीच वर्षात करू शकलो. अडीच वर्षाच्या ग्रहणातून मुंबईला आणि महाराष्ट्राला सोडवण्याचे काम आम्ही केले. कारण बंदसम्राट मुख्यमंत्रीपदावर बसले होते. आजही त्यांची भाषा बघा रिफायनरी बंद करू, धारावी प्रकल्प बंद करू अशी आहे. मग काय सुरू करणार आहात ते तरी सांगा. आता या बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आली आहे. दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलो तेव्हा प्रकल्पांना जी स्थगिती दिली होती ती आम्ही काढली आणि काम सुरू केलं. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. लाखो रोजगारांना संधी मिळत आहे. मुंबईचा कोस्टल रोड तर गेम चेंजर ठरला आहे. आणखी एका योजनेने महाविकास आघाडीचा गेम चेंज केला आहे. लाडक्या बहिणींच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडी कोमात गेली आहे. आमच्या योजनेला विरोध करणारे आता महालक्ष्मी योजना आणत आहे," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा आम्ही मुंबईत आणणार आहोत त्यासाठी सर्व सरकारी संस्थांना एकत्र घेऊन गृहप्रकल्प पुढे आणणार आहोत आणि जे मुंबईकर मुंबई बाहेर गेलेत त्यांना हक्काचे घर देणार आहोत हा आमच्या सरकारचा शब्द आहे. मुंबईला खड्डे मुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि प्रदूषण मुक्त करणार हा देखील आमचा शब्द आहे," असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in a meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.