“आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:56 PM2024-10-16T13:56:07+5:302024-10-16T14:03:25+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti PC: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

maharashtra assembly election 2024 cm eknath shinde reaction over maratha reservation issue and give advice to manoj jarange | “आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

“आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti PC: अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच महायुतीने एकत्रितपणे संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीसह विरोधकांवर सडकून टीका केली. पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला स्पष्ट शब्दांत उत्तर देताना मनोज जरांगे यांना एक सल्ला दिला आहे. 

मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आम्ही न्या. शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्याकडे संधी होती, हातात सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिले, सारथी दिले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दिले. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती देण्यात आल्या. हे सगळे कोणी केले? मराठा समाजाला कोणी वंचित ठेवले आणि कोणी दिले, याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला हवा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

आम्ही जे बोलतो ते करतो

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभा अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते आरक्षण कोणी घालवले, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही.  आता आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठी आटापिटा सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उद्देशून केली.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, तर मराठ्यांना फक्त एकनाथ शिंदे. तेवढाच धाडसी माणूस आहे जो, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. पण, आता मराठा आरक्षणावर बोलून काही फायदा नाही, हे समाजाला कळत आहे. आमच्या मुलांवर दीड लाख केसेस झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचा खूप फायदा घेतला. आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या हा आमचा फायदा आहे का? सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही हा फायदा आहे का? सातारा, बॉम्बे आणि हैदराबाद गॅझेट लागू केले नाही हा आमचा फायदा आहे का? अशी विचारणा करत मनोज जरांगे यांनी पलटवार केला.


 

Web Title: maharashtra assembly election 2024 cm eknath shinde reaction over maratha reservation issue and give advice to manoj jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.