Mumbai Congress : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही मुंबई काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेल्या रवी राजा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रवी राजा यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर रवी राजा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर टीकास्त्र डागलं. दुसरीकडे, आता काँग्रेस नेते अमित शेट्टी यांनीही वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
रवी राजा हे सायन कोळीवाडा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यानंतर रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड वारंवार डावलत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. रवी राजा यांच्यानंतर आता काँग्रेस नेते अमित शेट्टी यांनीही वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. अमित शेट्टी हे सुद्धा रवी राजा यांच्याप्रमाणे सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र दोघांनाही उमेदवारी नाकारुन गणेश कुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे.
"रवी राजा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे कारण मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि त्यांचे पती यांना मानत आहेत. दोघांनी मिळून काँग्रेस विकली आहे. मुंबईत काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. काँग्रेसला विकण्याचे पाप वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने केले आहे. मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे विनंती करत आहे की ताबडतोब वर्षा गायकवाड यांना काढायला हवं आणि काँग्रेसला वाचवालया हवं," असं अमित शेट्टी यांनी म्हटलं.
दरम्यान, याआधीही वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना मिळालेल्या उमेदवारीवरुन टीका केली होती. "हे दोघेही काँग्रेस पक्ष विकण्यासाठी चालले आहेत. वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीपासून काँग्रेस पक्षाला वाचवण्याची गरज आहे. पक्षातील वरिष्ठांना डावलून वर्षा गायकवाड यांच्याशी खास असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघांमध्ये साडेचार वर्षे ज्यांनी पक्षासाठी काहीच काम केले नाही, वर्षा गायकवाड यांचे मागे फिरले त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. धारावीत जे पक्षाचे सदस्य सुद्धा नाहीत अशा ज्योती गायकवाड यांना फक्त वर्षा गायकवाड यांची बहीण म्हणून उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीचे काँग्रेसला फार मोठे नुकसान होणार आहे," असं शेट्टी यांनी म्हटलं होतं.