Join us

“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:12 AM

Maharashtra Assembly Election 2024: आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. भाजपाचे व RSSचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष जागावाटप अंतिम करून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यावर भर देत आहेत. महाविकास आघाडीत १५ जागांचा तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत असून, महायुतीत २० ते २५ जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे समजते. यातच काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार टीका केली आहे. 

महायुतीचा चेहरा कोण आहे त्यांनी जाहीर करावे, असे आम्ही सातत्याने विचारत होतो. पण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूतच्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपाचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूतसह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला.

भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

पांचज्यन या आरएसएसच्या मुखपत्रात बाबा सिद्दिकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडल्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघ संघटनाही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दिकी आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही. आता बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपाला चालते. भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत निर्माण झालेले वादळ दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर शमले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत दोन पक्षांत निर्माण झालेल्या वादावर चर्चा होऊन त्यावर पडदा टाकून यापुढे सामंजस्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरले. उद्धव ठाकरे नुकतेच आपली नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीची प्रकृतीही चांगली असल्याचे चेन्नीथलांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडीमहायुती