विधानसभा निवडणूक: मुलीला मिळाला एबी फॉर्म; वडील नवाब मलिक मात्र अद्यापही प्रतीक्षेत
By दीपक भातुसे | Published: October 23, 2024 01:46 PM2024-10-23T13:46:09+5:302024-10-23T13:49:52+5:30
सना मलिक यांना अजित पवार गटाची उमेदवारी
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अजित पवार गटाने मंगळवारी आपल्या काही उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिले. यात मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाने माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना एबी फॉर्म दिला. मात्र, नवाब मलिक यांना मात्र एबी फॉर्म दिलेला नाही. नवाब मलिक हे अणुशक्तीनगरमधून विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ त्यांनी आपली मुलगी सना यांना सोडला असून, ते स्वतः मानखुर्द-शिवाजीनगर येथून लढण्याची तयारी करत आहेत. अजित पवार गटाकडून इथून उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा आहे.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे. मलिक तुरुंगातून सुटले तेव्हा त्यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही भाजपने विरोध केला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून दाऊदशी संबंधित मलिक यांना बरोबर घेऊ नये, असे कळवले होते. आता मलिक अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. हा विरोध लक्षात घेऊन अजित पवार यांनी सध्या तरी मलिक यांची उमेदवारी वेटिंगवर ठेवली आहे.
आतापर्यंत ४० जणांना दिले एबी फॉर्म
- अजित पवार गटाने आतापर्यंत सोमवार आणि मंगळवारी मिळून जवळपास ४० उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.
- जे लांबचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही एबी फॉर्म दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
गायत्री शिंगणे, धस यांनी घेतली अजित पवारांची भेट
- मागील आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणाऱ्या गायत्री शिंगणे यांनी मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश केला. गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांकडे सिंदखेडराजा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती.
- मात्र, दुसऱ्याच दिवशी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्या नाराज होत्या. आता अजित पवार गटाने गायत्री यांना उमेदवारी दिल्यास सिंदखेडराजामध्ये काका विरुद्ध पुतणी असा सामना बघायला मिळेल.
- आष्टी मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपचे सुरेश धस हेही मंगळवारी अजित पवार यांना भेटले. आष्टीत सध्या अजित पवार गटाचे भाऊसाहेब आसबे हे आमदार आहेत.