Join us

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”; राज ठाकरेंच्या विधानानंतर 'ही' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 7:00 PM

एका मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडी, महाराष्ट्रा नवनिर्माण सेना यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल महत्त्वाचे विधान केलं आहे. राज ठाकरे यांच्या विधानाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर राज्यभरात राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झालीय. अशातच एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केलं होतं. राज ठाकरे यांनी २०२४ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे म्हटले आहे. तर २०२९ चा मुख्यमंत्री हा मनसेचा असेल, असे भाकितही राज ठाकरे यांनी वर्तवले आहे. राज ठाकरे यांनी हे विधान केले असतानच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या सोबतचे फोटो सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये दोघेही चालताना दिसत आहेत. या फोटोसोबत देवेंद्र फडणवीस यांनी साम दाम दंड भेद असं गाणंही जोडलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोघेही एकत्र येणार असल्याची चर्चा फोटोखालच्या कमेंट सेक्शनमध्ये सुरु आहे.

दुसरीकडे, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठं विधान केलं. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) होतील, असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री? आपल्याला असे वाटते? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी "बिलकूल होऊ शकतात," असं म्हटलं. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४देवेंद्र फडणवीसराज ठाकरे