Malad Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे नऊ दिवस उरलेले असताना राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोरदार प्रचारसभा होताना दिसत आहेत. अशातच मालाड विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना इशारा दिला आहे. आहे तिथेच राहा, इथे तुमचे काही काम नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसी यांना इशारा दिला.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोद शेलार यांच्या प्रचारासाठी मालाड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत फडणवीसांना इशारा दिला होता. त्यानंतर मालाडमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसी यांना जाहीर इशारा दिला आहे.
विनोद शेलार यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात आपली ठाम भूमिका जाहीर केली. स्वत:ला ‘देवा भाऊ’ म्हणून संबोधत त्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच एक हैं ते सुरक्षित हैं अशी घोषणा देऊन भाषणाचा समारोप केला. भाजपचे आशिष शेलार यांनी या भागात विशेषत: मुस्लिमबहुल मालवणी भागातील ड्रग्जशी संबंधित चिंतेवर चर्चा केली. निवडणुकीनंतर अंमली पदार्थांच्या कारवाया नष्ट करण्याचे त्यांनी वचन दिले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी काँग्रेस आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्यावर मालाडचा विकास होत नसल्याची टीका केली.
"माझ्या हैदराबादमधील भावा तिथेच राहा इथे येऊ नको. इथे तुमचे काही काम नाही. इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहे. इथे येऊन औरंगजेबाचे गुणगान गायले जात आहे. मी सांगून ठेवतो भारतातील खरी मुस्लिम व्यक्तीसुद्धा औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. औरंगजेब तर आक्रमणं करायचा. त्यामुळेच अरे सुन लो ओवैसी, अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर," अशी घोषणा देवेंद्र फडणीवस यांनी दिली.