- महेश पवारमुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून, सध्या महायुतीतील भाजपचे त्यापैकी चार जागांवर, तर शिंदेसेनेचे दोन जागांवर आमदार आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर यंदा महायुतीला आपले मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यातही वरळी, माहीम आणि शिवडी या एकमेकांना लागून असलेल्या तीन मतदारसंघांमध्ये मनसेमुळे लक्षवेधी लढती होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
वरळीमध्ये आ. आदित्य ठाकरे (उद्धवसेना), राज्यसभा खा. मिलिंद देवरा (शिंदेसेना), संदीप देशपांडे (मनसे), अशी तिरंगी लढत होत आहे. माहीममध्ये अमित राज ठाकरे (मनसे), आ. सदा सरवणकर (शिंदेसेना), महेश सावंत (उद्धवसेना) यांच्यामध्ये चुरस आहे.
शिवडीमध्ये आ. अजय चौधरी (उद्धवसेना), माजी मंत्री बाळा नांदगावकर (मनसे) यांच्यात प्रमुख लढत असली, तरी नाना आंबोले (भाजप-अपक्ष) यांच्यामुळे येथे चुरस निर्माण झाली आहे. कुलाबामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (भाजप) आणि काँग्रेसचे हिरा देवासी असे उमेदवार आहेत. गेल्या वेळी १६ हजार मतांनी नार्वेकर यांचा विजय झाला होता. मात्र, बदललेल्या समीकरणामुळे ही जागा कायम ठेवण्याकडे भाजपचा कल राहील.
मागील तीन निवडणुकांमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे अमीन पटेल आताही मुंबादेवीमधून निवडणूक लढवीत आहेत. येथे भाजपने शायना एन. सी. हा नवीन चेहरा दिला आहे, तर मनसेचे केशव मुळ्येही रिंगणात आहेत. गेल्या वेळी पटेल यांनी पांडुरंग सकपाळ (शिवसेना) यांचा पराभव केला होता. सकपाळ यांना ३५,२९७ मते मिळाली होती. मलबार हिलमध्ये भाजपचे मंगलप्रभात लोढा आणि उद्धवसेनेचे भैरू चौधरी अशी लढत होत आहे. लोढा येथून सहावेळा निवडून आले आहेत.
भायखळ्यामध्ये शिंदेसेनेच्या आ. यामिनी जाधव आणि उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर अशी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी आ. मधुकर चव्हाण यांनी घेतलेली माघार जामसुतकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, येथील अल्पसंख्याक मते विजयासाठी आवश्यक ठरत असल्याने ही मते कुणाच्या बाजूने वळतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी या भागात संपर्क वाढवल्याचे चित्र आहे.
वडाळामध्ये यावेळी आ. कालिदास कोळंबकर (भाजप), माजी महापौर श्रद्धा जाधव (उद्धवसेना) आणि स्नेहल जाधव (मनसे) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. कोळंबकर हे ८ वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही जाधव यांच्यासमोर कोळंबकर यांचेच प्रमुख आव्हान असणार आहे.
सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सध्या मुंबईत गाजत आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड येथे प्रतिनिधित्व करत होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांची बहीण ज्योती गायकवाड येथून निवडणूक लढवीत आहेत. शिंदेसेनेचे राजेश खंदारे हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. सायनमध्ये आ. कॅप्टन तमिल सेल्वन आणि काँग्रेसचे गणेश यादव यांच्यात लढत होत आहे. यादव यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवसेनेत शिंदेसेना आणि उद्धवसेना अशी फूट पडली. त्यावेळी मुंबई शहरातील खा. राहुल शेवाळे, आ. यामिनी जाधव (भायखळा), आ. सदा सरवणकर (दादर - माहीम) आणि अमेय घोले, यशवंत जाधव, मंगेश सातमकर, समाधान सरवणकर, तृष्णा विश्वासराव या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. तर, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी, आ. आदित्य ठाकरे यांच्यासह सुमारे २० नगरसेवक उद्धवसेनेत राहिले. मुंबई शहरात ठाकरे यांना मानणारा वर्गही मोठा असल्यामुळे येथे उद्धवसेनेचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.