समाजाच्या संमेलनाआडून होतोय निवडणुकीचा प्रचार, प्रत्यक्ष मतदार भेटीला बगल; सोशल मीडियावरही मोठी मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 04:56 PM2024-11-09T16:56:49+5:302024-11-09T16:57:50+5:30

Maharashtra Assembly Election 2024: कडक उन्हात वणवण करण्यापेक्षा उमेदवार आता प्रचाराची नवनवीन तंत्रे अवलंबीत आहे. मतदारसंघात कोणत्या समाजाची किती संख्या आहे, यानुसार कार्यकर्त्यांमार्फत विविध समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित करून उमेदवार त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत असल्याचे चित्र सध्या मुंबईतील काही भागांत पाहायला मिळत आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Election campaigning is being done through community gatherings, avoiding actual voter visits; Big fan on social media too | समाजाच्या संमेलनाआडून होतोय निवडणुकीचा प्रचार, प्रत्यक्ष मतदार भेटीला बगल; सोशल मीडियावरही मोठी मदार

समाजाच्या संमेलनाआडून होतोय निवडणुकीचा प्रचार, प्रत्यक्ष मतदार भेटीला बगल; सोशल मीडियावरही मोठी मदार

 मुंबई - कडक उन्हात वणवण करण्यापेक्षा उमेदवार आता प्रचाराची नवनवीन तंत्रे अवलंबीत आहे. मतदारसंघात कोणत्या समाजाची किती संख्या आहे, यानुसार कार्यकर्त्यांमार्फत विविध समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित करून उमेदवार त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत असल्याचे चित्र सध्या मुंबईतील काही भागांत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच उमेदवाराच्या दिवसभरातील कार्यक्रम, भेटी-गाठी यांचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती करण्यात आल्याचेही समोर येत आहे.

विधानसभा मतदारसंघ पूर्ण पायी फिरणे, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेणे, या प्रचलित पद्धतीबरोबर प्रचाराच्या नवनवीन शक्कल उमेदवार शोधत आहेत. यामध्ये मतदार याद्यांच्या आधारे कोणत्या भागात एखाद्या समाजाचे किती मतदार आहेत, याची यादी बनविली जात आहे. त्यानुसार त्या समाजातील नागरिकांना एका ठिकणी हॉलमध्ये स्नेहसंमेलनाच्या नावाखाली एकत्र बोलाविले जात आहे. त्या ठिकाणी समाजातील धर्मगुरू किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला बोलावून त्यामार्फत मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे उमेदवार हे काम स्वतः करत नसून, कार्यकर्ते किंवा ओळखीच्या व्यक्तीमार्फत करताना दिसत आहेत.     

त्यातही सोशल मीडियाचे प्राथमिक ज्ञान असणाऱ्या मुला-मुलींना सध्या सुगीचे दिवस आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या सर्वच उमेदवार सोशल मीडियाचा ताकदीने वापर करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी काही ‘टेकसॅव्ह’ तरुणांच्या टीमची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये व्हिडीओ एडिटर, फोटोग्राफर, तसेच काही मुलांना  दिवसभरातील व्हिडीओ, फोटो शेअर करण्यासाठी चांगले पैसे देऊन काम देण्यात आले आहे. 

सोशल मीडिया प्रचारमय 
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेक नागरिक उमेदवारांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसत आहे. त्यामुळे काही उमेदवारांचा आपोआपच त्याद्वारे प्रचार होत आहे. 
सध्या हायपर लोकल वेबसाइट आणि सोशल मीडियावर विधानसभेतील विविध गोष्टींची माहिती थोडक्यात दिली जात आहे. त्यावर अनेक तरुण व्यक्त होत आहेत; तर काही हौशी मिम बनवून काही उमेदवाराची खिल्लीसुद्धा उडविताना दिसत आहेत. 
काही पक्षाच्या जाहिरातींवर, गाण्यांवर, नेत्यांच्या भाषणांवर टीका; तर काहीजण कौतुक करताना आढळून येत आहेत. संपूर्ण सोशल मीडिया काही दिवसांत प्रचारमय झाला आहे.

आजी-आजोबाच्या फोटोला पसंती  
घरोघरी प्रचार करताना उमेदवार ज्येष्ठ नागरिक, आजी-आजोबा दिसले की, तत्काळ त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत फोटो काढत आहे. तसेच त्या  ठिकाणी काही लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत. हे सर्व फोटो सोशल मीडिया टीम त्या उमेदवाराच्या प्रोफाइलवर टाकले जात आहेत. त्याद्वारे मतदारांमध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Election campaigning is being done through community gatherings, avoiding actual voter visits; Big fan on social media too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.