पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 06:15 AM2024-10-27T06:15:43+5:302024-10-27T06:16:17+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी आहेत. त्याच्या पुनर्विकासासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वसाहतीत रस्ते, पाणी, स्वच्छतेची मोठी समस्या आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : चारकोपमधून तीन वेळा आमदार झालेले योगेश सागर पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुधेलिया ट्रस्टचे कालूभाई बुधेलिया यांना काँग्रेसने, तर मनसेने दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली आहे. मराठी आणि गुजराती भाषकांचे प्रमाण येथे अधिक असले तरी पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते निर्णायक ठरणार आहेत, तर उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळे येथील परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत, असे येथील स्थानिक नागरिकांचे मत आहे.
चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी आहेत. त्याच्या पुनर्विकासासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वसाहतीत रस्ते, पाणी, स्वच्छतेची मोठी समस्या आहे. नाले आणि गटारांची कामे अर्धवट झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान होते. या समस्येचे समाधान करण्यात ते अपयशी ठरल्याचा सूर आहे. कोळी समाजाला मासळीबाजार उपलब्ध नसल्यामुळे मालाडला जावे लागते. फेरीवाले यांची मोठी समस्या आहे.
गणिते बिघडवणारे मतदार...
मराठी मतदारांपाठोपाठ उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक समाजाची मते येथील गणिते बिघडवणारी ठरणार आहेत. मराठी मते उद्धवसेनेकडे, तर अल्पसंख्याक मते काँग्रेसकडे आहेत, तर कमी प्रमाणात असणारी गुजराती आणि अन्य भाषिक मते भाजपाला मिळतील. यावेळी उद्धवसेना सोबत असल्याचा फायदा काँग्रेसला होईल, असाही होरा आहे.