मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाकडून आतापर्यंत १४५ हून अधिक उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात मुंबईत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना तिकिट न मिळाल्याने ३ बडे नेते नाराज आहेत. या नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत बंडखोरीचीही तयारी केली आहे. बोरिवली, मुंबादेवी आणि घाटकोपर पूर्व या जागेवरून इच्छुक भाजपा नेत्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे.
मुंबादेवी इथं भाजपाचे अतुल शाह हे इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेली. तिथे भाजपा नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबादेवीतून महायुतीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवणार आहेत. मात्र या निर्णयाने नाराज अतुल शाह म्हणाले की, दिवसरात्र मी पक्ष संघटनेसाठी काम केले, आज आम्हाला डावलून निर्णय घेतला. या निर्णय प्रक्रियेत आम्हाला विचारलेही नाही. शायना एनसी यांच्याशी मतभेद नाहीत. स्थानिक नेतृत्वाला विचारात न घेता निर्णय घेतला त्याचे वाईट वाटते. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची किंमत पक्षाला नाही. पक्षनेतृत्वावर आमची नाराजी आहे. मला रात्री आशिष शेलारांचा फोन आला. ते म्हणतायेत तुम्ही फॉर्म भरू नका असं सांगितले परंतु मी अपक्ष निवडणूक अर्ज भरणार आहे असं त्यांनी सांगितले.
तर घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आमदार पराग शाह यांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयावर प्रकाश मेहता नाराज असल्याची माहिती आहे. प्रकाश मेहता घाटकोपर पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात प्रकाश मेहता हे ६ वेळा आमदार राहिले आहेत. परंतु २०१९ च्या निवडणुकीत मेहता यांची उमेदवारी नाकारून पराग शाह यांना उमेदवारी दिली. मात्र २०२४ पुन्हा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा प्रकाश मेहता यांनी व्यक्त केली होती. परंतु या मतदारसंघात पुन्हा पराग शाह यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, बोरिवली मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित गड मानला जातो. या मतदारसंघात भाजपाकडून माजी खासदार गोपाळ शेट्टी इच्छुक होते. मात्र इथेही विद्यमान आमदार सुनील राणे यांना डावलून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. लोकसभेला गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी नाकारून पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळाली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली मतदारसंघात आतापर्यंत भाजपाचे उमेदवार कायम जिंकून आलेत. २०१४ साली विनोद तावडे, २०१९ साली सुनील राणे यांना बोरिवलीत उमेदवारी दिली. त्यानंतर आता २०२४ निवडणुकीत पुन्हा नवीन चेहरा भाजपाने मतदारसंघात दिला आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी नाराज होत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.