गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार

By मनोहर कुंभेजकर | Published: October 29, 2024 06:34 AM2024-10-29T06:34:40+5:302024-10-29T06:37:54+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मंगळवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Maharashtra Assembly Election 2024 : Gopal Shetty will fight as an independent from Bareivali in a rebellious posture, for the honor of the locals | गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार

गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून उमेदवारी नाकारल्यानंतर विधानसभेसाठी बोरीवलीतून इच्छुक असलेल्या माजी खा.गोपाळ शेट्टी यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपण नाराज झालो असून, बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बोरीवलीतून विद्यमान आ.सुनील राणे, संजय पांडे हेही इच्छुक होते, पण येथून संजय उपाध्याय यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शेट्टी यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. ते रस्त्यावर उतरले होते. पोयसर जिमखान्याबाहेर त्यांनी घोषणाबाजी केली. निर्णय बदलून शेट्टी यांना तिकीट देण्याची मागणी त्यांनी केली. दोन वेळा खासदार राहिलेले गोपाळ शेट्टी ‘लोकमत’शी बोलताना  म्हणाले की, बोरीवली ही काही धर्मशाळा नाही. 
भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. 

कायद्यात कुणी कुठून लढू नये, असे लिहिलेले नाही, परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढविली जाते. पहिल्यांदा विनोद तावडे यांना येथे आणले. त्यानंतर, सुनील राणेंना आणले. मी खासदार होतो. मला बदलून पीयूष गोयल यांना तिकीट दिले, तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र, आता पुन्हा तसेच झाले. संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि पक्षासाठी त्यांनी काम केले आहे, यात शंका नाही, परंतु बोरीवली 
मतदारसंघात वारंवार अशा प्रकारे खेळ करणे बरोबर नाही. रात्री उशिरा गोपाळ शेट्टी उद्धवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

...तर पुढची ५० वर्षे बोरीवलीचा वापर...
मी बोरीवली मतदारसंघाचे आव्हान स्वीकारले नाही, तर पुढची ५० वर्षे बोरीवलीचा अशा प्रकारे वापर केला जाईल. ज्या बोरीवलीने मला पुढे आणले, त्या लोकांसाठी जे करणे शक्य आहे, ते मी करेन, असे त्यांनी सांगितले. 

गेल्या ३३ वर्षांत मी एकही चुकीचे काम केले असेल, तर पक्षाने मला सांगावे. मी मरेपर्यंत पक्षाचे मजुराप्रमाणे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कुणाशीही चर्चा केला नाही, हे योग्य नाही. वारंवार छळ करणे योग्य नाही. ही लढाई मी लढणार आहे.
    - माजी खा.गोपाळ शेट्टी

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Gopal Shetty will fight as an independent from Bareivali in a rebellious posture, for the honor of the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.