Join us

दहिसरमधून मीच उभा राहणार! डॉ.विनोद घोसाळकर यांची स्पष्टोक्ती

By मनोहर कुंभेजकर | Published: October 18, 2024 11:34 AM

१८ वर्षे त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुखपद भूषवले असल्याने आपला दांडगा जनसंपर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-दहिसर विधानसभा मतदार संघातून २०१४ पासून सलग दोन वेळा आमदार असलेल्या मनीषा चौधरी यांना यंदा यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.उद्धव सेनेचे नेते व माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर यांना येथून उमेदवारी मिळणार आहे.घोसाळकर हे २००९ ते २०१४ या काळात येथील शिवसेनेचे आमदार राहिले असून १८ वर्षे त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुखपद भूषवले असल्याने आपला दांडगा जनसंपर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात घोसाळकर यांची भेट घेतली असता,महाविकास आघाडी भक्कम असून आपण येथून जिंकून येण्यासाठी लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.गेली चार महिने आपण मतदारसंघ पुन्हा एकदा बांधला असून उद्धव सेनेच्या येथील वशाखा चार्ज केल्या आहे.गणपती आणि नवरात्रीत मतदार संघ पिंजून काढला असून भेटीगाठींवर भर दिला आहे.या मतदारसंघातील नागरी समस्यांवर आपण आवाज उठवला आणि अनेक उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना येथून तिकीट मिळणार असल्याचे वृत्त अलिकडेच काही वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले होते,याबद्दल विचारले असता त्यांनी इन्कार केला.आपल्याला उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तर १९९४ पासून आपण पक्षात कार्यरत असून आपल्याला उमेदवारी मिळावी असे पत्र उत्तर मुंबई भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुख निला राठोड सोनी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र दिले आहे.तर माजी नगरसेवक जगदीश ओझा यांना सुद्धा उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे या मतदार संघात विद्यमान आमदार मनीषा चौधरी विरुद्ध डॉ.विनोद घोसाळकर अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व येथून कोणाला तिकीट देणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि दहिसरकरांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकदहिसरशिवसेना