Kishori Pednekar Slams Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राज ठाकरेंनी जाहीर सभेत शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकीसंदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गटावर टीका केली होती. शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन ठाकरे गटाने आता त्यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेची निशाणी काही जणांना टोचायला लागली आहे, म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे.
महायुतीसह महाविकास आघाडीवर राज ठाकरे यांनी पहिल्याच सभेत जोरदार हल्ला चढवला. शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे त्यांची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार आहेत का असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केली. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचेच आहे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
"शिवसेनेची निशाणी काही जणांना टोचायला लागली आहे. त्यामुळे काही नेत्यांनी काल भाषण केलं. धनुष्यबाण एकनाथ शिंदेंची निशाणी नाही. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचेच आहे. त्यात सांगायची काय गरज आहे. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेचे याचे हक्कदार होऊ शकतात. निशाणी जर तुम्हाला प्रॉपर्टी वाटत असेल तर तुमची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार आहात का? किंवा तुमच्या घरातील नोकराला देणार आहात का?" असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
राज ठाकरेंनी मुख्य मैदानात काय चाललं आहे ते पहावं - संजय राऊत
"शिवसेना बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे. शरद पवारांच्या हयातीत ती अजित पवारांना देणारं निवडणूक आयोग कोण? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संपत्ती आहे, जनता, शिवसैनिक, शिवसेना, धनुष्यबाण ही एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण? हाच तर आमचा सवाल आहे. त्याच मोदी-शाहांची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. मुळात त्यांचा हल्ला मोदी शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये. सभागृहात, मुख्य मैदानात काय चाललं आहे ते पहावं," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
काय म्हणाले राज ठाकरे?
"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं.