"तुमची बायको सूनेला..."; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:53 PM2024-11-19T18:53:57+5:302024-11-19T19:01:40+5:30

शिवडीतल्या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Kishori Pednekar responded to the criticism made by Raj Thackeray | "तुमची बायको सूनेला..."; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर

"तुमची बायको सूनेला..."; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Election 2024 : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शिवडीतल्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. महाराष्ट्रात २०१९ पासून जे काही झालं त्याला उद्धव ठाकरे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भांडखोर सासूचीही उपमा दिली होती. यावरुनच आता ठाकरे गटाने राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवडीतल्या शेवटच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे या एका माणसाने अख्या पक्षाची वाट लावली अशी जहरी टीका केली होती. तसेच एक उदाहरण देत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिवसेनेची सासू बसलीय आतमध्ये, तिचा प्रॉब्लेम आहे, असं म्हटलं होतं. माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

"निवडणुका सुरु झाल्यापासून राज ठाकरे यांनी भाषणे विसंगत असल्याची पाहायला मिळत आहे. तुमचे उमेदवार उभे करुन तुम्ही मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहात आहात. खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलंत, तुमची पण बायको आता एक सासूच आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?" असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

"अनुभवा शिवाय कोण बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली, त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे, तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाचं मीलन करत असाल, तर घरातूनच सुरुवात आहे, घरातच सुनेला जाच आहे, खाष्ट सासू म्हणून हिणवणं, हा स्त्रियांचाच अपमान आहे, तो पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहे," असेही किशोरी पेडणेकरांनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"काँग्रेस आणि राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घ्यायला ज्यांना लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. मला मुख्यमंत्री करा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते जाऊन बसले होते. एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले त्यांना हे गद्दार म्हणत आहेत. गद्दार तर घरात बसला आहे ज्याने पक्षासोबत गद्दारी केली. शिवसेनेची जी सासू आतमध्ये बसली आहे  तिचा प्रॉब्लेम आहे. ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे. हे जर परत निवडून आले तर महाराष्ट्र संपला म्हणून समजायचे तुम्ही. २०१९ पासून जे काही झालं ते विसरु नका. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Kishori Pednekar responded to the criticism made by Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.