Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघातल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान अमित ठाकरेंसमोर आहे. राज ठाकरे यांनी रविवारी अमित ठाकरेंसाठी माहीममध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता सदा सरवणकर यांनीही सभांचा धडाका लावला असून त्यांचे कुटुंबियसुद्धा जोरदार प्रचार करत आहेत. सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी प्रचारसभेत बोलताना ठाकरे कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला. आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? असा सवाल प्रिया सरवणकर यांनी यावेळं केलं.
माहीम मतदारसंघातल्या निवडणुकीमुळे दादर माहीममध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी झालेल्या सदा सरवणकर यांच्या प्रचारसभेत अमित ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. प्रिया सरवणकर यांनीही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्या युवराजाला जनता कंटाळली असून आता हा राजपुत्र काय करणार आहे? असा सवाल प्रिया सरवणकर यांनी केला. प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंसह, ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर जोरदार टीका केली.
"मनसे नवीन चेहरा राजकारणात उतरवला आहे असे सांगत आहे. ते जर या उमेदवाराला ते फ्रेश चेहरा म्हणत असतील तर हा फ्रेश चेहरा चित्रपटांसाठी ठीक आहे. त्याचे राजकारणात काय काम? ते ज्या गल्लीत प्रचाराला जातात, तिथले पाच मुलभूत प्रश्नही त्यांना सांगता येत नाहीत. असा नवीन चेहरा कुणाला हवाय? मनसेने त्यांना प्रमोट करताना नवीन चेहरा असल्याचे म्हटले. नेता म्हटले तर त्याला कर्तुत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व हवे. माझा प्रश्न आहे, फक्त आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का?" असा सवाल प्रिया सरवणकर यांनी केला.
"फक्त हातवारे केले म्हणजे आमदार होता येत नाही. एक युवराज वरळीकरांनी निवडून दिलाय. त्या युवराजाला निवडून देऊन तेथील जनता पश्चाताप व्यक्त करत आहे. एका युवराजाला मत देऊन जर मतदार पाच वर्ष पस्तावत आहे. आता या राजपुत्राला तुम्ही मतदान करणार का? लोकांना राजपुत्र नको तर त्यांची सेवा करणारा सेवक हवा आहे," असेही प्रिया सरवणकर म्हणाल्या.
"मनसेचा पळपुटा पदाधिकारी ज्याला नगरसेवक पदावरही विजय मिळविता आला नाही, तो आज आम्हाला शिकवत आहे. पक्षाने मागच्या वेळी त्याला माहीम विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. यावेळी त्याला वरळीत धाडले. या पांडेला नगरसेवक, आमदार म्हणून जिंकून येता येत नाही. तो आमच्या बद्दल बोलतो," असा टोला प्रिया सरवणकरांनी संदीप देशपांडेंना लगावला.