"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: October 19, 2024 11:33 AM2024-10-19T11:33:20+5:302024-10-19T12:05:57+5:30
Maharashtra Assembly Election 2024: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी, अशी मागणी शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कडे केली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - २०१४ पासून विलेपार्ल्यात भाजपाचे आमदार अँड.पराग अळवणी सलग दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी अशी मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कडे केली. काल त्यांनी मुंबईत जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. यावेळी सुमारे १५ मिनीटे राजकीय आणि आरोग्य विषयक चर्चा या दोघांमध्ये झाली.
आपण निवडणूक लढण्यासाठी विलेपार्ले मतदार संघातून इच्छुक असून, ही जागा शिंदे सेनेला सोडण्यासाठी त्यांनी नड्डा यांच्या कडे आग्रह धरला. दि,३० जून २०२४ रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ही जागा शिंदे सेनेची असतांना अखेरच्या क्षणी पदवीधर निवडणुकीसाठीचा आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला केली होती आणि तुमचे राजकीय पुनर्वसन करु असे आश्वासन भल्या पहाटे आपल्याला दिले होते. त्यामुळे त्याबदल्यात आता ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी या चर्चेदरम्यान केल्याचे समजते.
यापूर्वी डॉ.दीपक सावंत यांनी विलेपार्ले मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून या जागेसाठी आपला विचार व्हाव्हा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेचे नेते,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेवून त्यांना पत्र देखिल दिले होते.गेली ४० वर्षे या परिसरात शालेय जीवन, कॅालेज जीवन, वैद्यकीय व्यवसाय तसेच लायन्स जायन्टस् रोटरी मधे काम, पार्ले टिळक, मिठीबाई, लोकमान्य सेवासंघ, उत्कर्ष मंडळ,साठ्ये महाविद्यालय ,जैन समाज , व्यापारी संघ अशा अनेक संस्थांशी आपला जवळचा संबंध आहे, तरी आपण विलेपार्ल्याची जागा शिंदे सेनेला सोडण्यासाठी पॅाझीटीव्हली विचार करावा अशी विनंती त्यांनी नड्डा यांच्या कडे केल्याचे समजते.