माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 06:32 AM2024-10-27T06:32:29+5:302024-10-27T06:33:46+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धवसेनेने महेश सावंत यांना तर शिंदेसेनेने सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना माहीममध्ये महायुतीने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. ही जागा शिंदेसेनकडे असून, विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. अशावेळी, अमित ठाकरेंना पाठिंब्याबाबत शिंदेच निर्णय घेतील असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंबाबत काही वाटत नाही म्हणून त्यांनी उमेदवार दिला आहे; पण महायुतीने नाते जपायला हवे. आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. उद्धवसेनेने महेश सावंत यांना तर शिंदेसेनेने सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे.
मीच लढणार, मीच जिंकणार : सरवणकर
माहीम मतदारसंघात मीच लढणार आणि मीच जिंकणार असे सदा सरवणकर यांनी दिवसभराच्या घडामोडींवर बोलताना स्पष्ट केले.ते म्हणाले की लढण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते अजित पवार गटाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत.माघार घेण्याचा प्रश्नच नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा फोन आलेला नाही. सरवणकर यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी करून त्यांना जोरदार पाठिंबा जाहीर केला. माहीममध्ये आमचाच भगवा फडकणार असे समर्थकांनी सांगितले.
...तर कोपरीतून माघार घेणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघात लढत असून मनसे तिथे अभिजित पानसे यांना उमेदवारी देणार अशी चर्चा आहे. शिंदे यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर शिंंदेंविरोधात मनसे उमेदवार देणार नाही, अशीही चर्चा आहे.
शिंदे यांचे निकटवर्ती मंत्री दीपक केसरकर हे सकाळी शिवतीर्थवर गेले; आपल्याविरोधात सावंतवाडी मतदारसंघात मनसेने उमेदवारी देऊ नये, अशी विनंती केली; पण राज यांनी त्यांच्याशी काहीही बोलण्यास नकार दिला.