२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान

By दीपक भातुसे | Published: November 7, 2024 09:07 AM2024-11-07T09:07:34+5:302024-11-07T09:16:42+5:30

Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या १४ पैकी तब्बल १० मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगल्या मतांची आघाडी होती, तर केवळ चार मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे २०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना इथे महायुतीची दमछाक होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Mahayuti will struggle to maintain the seats won in the 2019 Legislative Assembly, Mavia will face a tough challenge in North Central and East Mumbai | २०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान

२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान

- दीपक भातुसे 
मुंबई - उत्तर मध्य मुंबई आणि पूर्व मुंबईतील १४ विधानसभा मतदारसंघांत महायुतीसमोरमहाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. २०१९ च्या विधानसभेचा निकाल, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट यानंतर या १४ मतदारसंघांची सद्य:स्थिती बघितली तर इथे ९ आमदार महायुतीचे आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या १४ पैकी तब्बल १० मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगल्या मतांची आघाडी होती, तर केवळ चार मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे २०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना इथे महायुतीची दमछाक होणार आहे.

पूर्व मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. १९९० पासून इथल्या मतदारांनी सलग भाजपला साथ दिली आहे. यावेळी भाजपने विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना पुन्हा संधी दिली आहे, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून राकेश शेट्टी रिंगणात आहेत. मुलुंडची लढाई तशी भाजपसाठी सोपी मानली जात आहे.

विक्रोळीत उद्धवसेनेचे वर्चस्व आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत इथले विद्यमान आमदार असून त्यांच्यासमोर शिंदेसेनेच्या सुवर्णा करंजे रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतही मविआच्या उमेदवाराला इथे चांगली आघाडी होती. त्यामुळे राऊत यांच्यासाठी ही लढाई कठीण नाही.

भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा मुकाबला होणार आहे. इथे उद्धवसेनेकडून विद्यमान आमदार रमेश कोरेगावरकर रिंगणात असून, शिंदेसेनेकडून माजी आमदार अशोक पाटील यांनी त्यांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत इथे मविआच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असली तरी पूर्वाश्रमीचे दोघेही शिवसैनिक समोरासमोर उभे ठाकल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे.

घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे विद्यमान आमदार राम कदम विरुद्ध उद्धवसेनेचे संजय भालेराव असा मुकाबला आहे. मागील निवडणुकीत अपक्ष असलेल्या भालेराव यांचा पराभव झाला होता; पण त्यांनी ४१,४७४ मते घेतली होती. यावेळी उद्धवसेनेसह मविआच्या इतर पक्षांची त्यांना साथ आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मविआला १५,७७२ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे सलग तीन वेळा इथून विजयी झालेल्या राम कदम यांच्यासमोर यावेळी आव्हान असणार आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे पराग शहा विरुद्ध शरद पवार गटाच्या राखी जाधव यांच्यात मुकाबला आहे. घाटकोपर पूर्वही भाजपचा गड मानला जातो. २०१९च्या निवडणुकीत भाजपने प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केला होता, त्यापूर्वी मेहता यांनी या मतदारसंघात भाजपची ताकद वाढवली होती. त्यामुळे माजी नगरसेवक असलेल्या राखी जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे.

मानखुर्द शिवाजीनगर या  अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात सपाचे अबू आझमी इथून विद्यमान आमदार आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांच्यासमोर अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांनी आव्हान उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवाराला या मतदारसंघात भरघोस आघाडी मिळाली होती. मात्र, मलिक आपला अणुशक्तीनगर हा मतदारसंघ सोडून इथे आल्याने आझमी यांना यावेळची लढत कठीण जाणार आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात शिंदेसेनेकडून सुरेश पाटील रिंगणात आहेत.

अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक विद्यमान आमदार आहेत. त्यांनी अजित पवार गटाकडून आपली मुलगी सना मलिक यांना इथे रिंगणात उतरवले आहे, तर त्यांच्यासमोर मविआकडून सपाचे उमेदवार फहाद अहमद हे उभे आहेत. फहाद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. फहाद यांच्यासाठी नव्या असलेल्या या मतदारसंघातील लढत जड जाईल, अशी चिन्हे आहेत.

चेंबूर मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये लढत आहे. इथे उद्धवसेनेकडून विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर, तर शिंदेसेनेकडून माजी आमदार तुकाराम काते रिंगणात आहेत. फातर्पेकर सलग दोन वेळा इथून निवडून आले आहेत, तर काते हे २०१४ च्या निवडणुकीत अणुशक्तीनगरमधून विजय झाले होते. त्यामुळे काते यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे. याशिवाय काँग्रेसची या मतदारसंघात ३५ हजारच्या घरात मते आहेत, फातर्पेकरांसाठी या जमेच्या बाजू आहेत.

उत्तर मध्य मुंबईत विलेपार्लेमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. इथे भाजपचे विद्यमान आमदार पराग अळवणी यांच्यासमोर उद्धवसेनेचे संदीप नाईक रिंगणात आहेत. अळवणी मागील सलग दोन वेळा इथून निवडून आले असले तरी अळवणी यांच्यासाठी यावेळची लढत तशी अवघड नाही.

महायुतीचे दोन उमेदवार
शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आणि शिंदेसेनेने विरोध करूनही अजित पवार गटाने इथे नवाब मलिक यांना पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. महायुतीबरोबर असूनही अजित पवारांनी इथे भाजपचा तीव्र विरोध डावलून मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या आधी शिंदेसेनेकडून इथे सुरेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आपण इथे नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. 

ठाकरेंविरुद्ध शिंदे 
१४ पैकी ४ मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा सामना होणार आहे. यात विक्रोळी, भांडुप पश्चिम, चेंबूर आणि कुर्ला या मतदारसंघांचा समावेश आहे, तर घाटकोपर पश्चिम आणि विलेपार्ले या मतदारसंघात उद्धवसेना विरुद्ध भाजप असा मुकाबला होणार आहे. 

चांदिवलीत शिंदेसेनेचे विद्यमान आमदार दिलीप लांडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान असा मुकाबला आहे. कुर्ल्यात शिंदेसेनेचे मंगेश कुडाळकर विरुद्ध उद्धवसेनेचे प्रवीण मोरजकर यांच्यात सामना आहे. वांद्रे पूर्वमध्ये विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटाकडून लढत आहेत, तर त्यांच्या विरोधात ठाकरेंचे नातेवाईक उद्धवसेनेचे वरुण सरदेसाई रिंगणात आहेत. वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशिष शेलार यांच्यासमोर काँग्रेसच्या असीफ झकेरिया यांचे आव्हान आहे. कलिनात उद्धवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांच्याविरोधात भाजपने अमरजीत सिंग यांना रिंगणात उतरविले आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Mahayuti will struggle to maintain the seats won in the 2019 Legislative Assembly, Mavia will face a tough challenge in North Central and East Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.