Join us

सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 8:21 PM

माहिम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून अमित ठाकरेंना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. 

मुंबई - सदा सरवणकर हे लढाऊ आहेत, ते कधीच अर्ज मागे घेणार नाहीत आणि स्वत:चं करिअर संपवणार नाहीत. ते लढून जिंकणारे माणूस आहेत असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी सरवणकरांच्या अर्ज माघारी घेण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. 

महेश सावंत म्हणाले की, मला वातावरण अतिशय पोषक आहे. उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार दिलाय, तो २४ तास दिसणारा आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. त्यामुळे समोर कोण हे मी बघत नाही. माझा थेट संबंध नागरिकांशी आहे. लढाई म्हटलं की आव्हान वाटते. राजसाहेब मोठे आहे. हा कौल जनता जर्नादन देणार आहे. जनतेच्या मनातला उमेदवार हा महेश सावंत आहे. त्यामुळे जनता निर्णय घेईल. मला लोकांची सेवा करायची संधी मिळेल. माहिम दादरमध्ये कितीतरी प्रश्न आहेत. पाण्याचा दाब कमी आहे. महेश सावंत काय करतो हे १ वर्षातच समजेल असं त्यांनी सांगितले.

तसेच मी भाग्यवान समजतो, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष माहिम मतदारसंघावर लागलं आहे. मला जराही टेन्शन नाही. या निवडणुकीतून सर्वसामान्य मुलगा मोठमोठ्या माणसांसोबत लढतोय हे दिसून येईल. माहिम १०० टक्के आम्ही जिंकून येणार. आव्हान पेलूनच आम्ही जिंकू. मला दोन्ही उमेदवारांचे आव्हान वाटत नाही. आमदार हा लोकांचा सेवक आहे ते दिसतील. बाळासाहेबांनी बाळा नांदगावकरांवर मनाचा मोठेपणा दाखवला होता, नांदगावकर काय होते आणि बाळासाहेबांनी काय बनवले. त्यांनी कुठे कालांतराने बाळासाहेबांची किंमत ठेवली असं महेश सावंत यांनी म्हटलं.

"राज ठाकरेंकडे मोठं मन असतं तर..."

२०१९ सालचं उद्धव ठाकरेंचे एकतरी विधान दाखवा, ज्यात ते राज ठाकरेंकडे गेलेत आणि उमेदवार मागे घ्या म्हणून बोलले. कधी कधी स्वत:चा मोठेपणा गाजवला जातो. आतासुद्धा वरळीत त्यांच्याकडे उमेदवार नाही. जो आहे तो आयात केलेला आहे. माहिममधला वरळीत लढवतोय. वरळी भक्कम आहे मग वरळीतला उमेदवार दिला पाहिजे होता. तिथे उमेदवार नव्हता. जगाला दाखवावं आणि स्वत:ची शाबासकी घ्यावी यासाठी राज ठाकरे तसं बोलले होते. राज ठाकरेंना मोठं मन दाखवायचे असते तर आज त्यांनी स्वत:हून वरळीत उमेदवार उभा केला नसता. वरळीत मनसे फॉर्मात नाही असं महेश सावंत यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४माहीममुंबई विधानसभा निवडणूकमनसेराज ठाकरेअमित ठाकरेसदा सरवणकरउद्धव ठाकरे