"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:45 PM2024-11-15T22:45:24+5:302024-11-15T22:54:58+5:30
दादरमधल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना इशारा दिला आहे.
Mahim Assembly Constituency : माहीममधल्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तर शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यासोबत अमित ठाकरेंची लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच महेश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना जाहीर इशारा दिला आहे. तसेच मनसेवरही आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केलीय.
गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले होते. त्यावेळी दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले असता सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या प्रकरणावरुनच आता आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकरांना इशारा दिला आहे. सरवणकरांवर यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
"माझा पक्ष फोडला खोके खाल्ले असतील. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. पण तुम्ही गणपतीच्या मिरवणुकीत दादरकरांवर बंदूक रोखलीत, पोलीस ठाण्यात गोळी चालवली. त्याच प्रकरणात तुम्हाला यूएपीएमध्ये आत टाकणार. माहीममध्ये गल्ली गल्ली जातात आणि दुकानदारांकडे पैसे मागतात. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या सगळ्या चाव्या तुमच्याकडे ठेवता. तुम्हाला आत्ताच इशारा देत आहे २३ तारखेला आमचं सरकार बनणार आहे आणि २४ तारखेला तुमच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करणार," असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
"मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष"
"मनसेने आज मला बोलायला भाग पाडलं आहे. आपल्याला आधी वाटलं असेल मनसे म्हणजे मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष आहे. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झाली आहे की महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे ती म्हणजे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष. ज्या नरेंद्र मोदींच्या पक्षाला यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांनीच बाळासाहेबांची शिवसेना फोडली. हेच ते मोदी आहेत ज्यांच्या भाजप पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून उतरायला भाग पडलं. मनसेचा पाठिंबा हा इथून गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे. मनसेने नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला होता तो गुजरातच्या न्याय हक्कासाठी होता का. ज्या देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही पाठिंबा दिला त्यांनीच एकनाथ शिंदे, आपल्या पक्षाला फोडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंना दुःख देण्याचे काम केले. कुठल्यातरी पक्षाने माझ्यासोबत सेटलमेंट केली म्हणून मी लढत नाहीये. मनसे आज उठली आहे. दोन महिन्यांपासून सगळीकडे प्रचार करत आहे गेल्या पाच वर्षात तुम्ही दिसला का नाही," असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.