Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:16 IST2024-10-28T14:15:08+5:302024-10-28T14:16:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024 And Sharmila Thackeray : राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे देखील रॅलीमध्ये सहभागी झाल्या.

Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. कारण या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवार देण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत
अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी मनसेकडून रॅली काढण्यात आली. याच दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे देखील रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. "पैशाचं बळ विरुद्ध माणसांचं बळ अशी लढाई आम्ही लढणार आहोत. लोकांनी आता ठरवायचं आहे की, त्यांना पैसे हवेत की काम करणारा माणूस हवा आहे" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"अभिमानाने ऊर भरून आला आहे. आपला मुलगा लढाईला उतरला याचा आनंद झाला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जण आलो आहोत. पैशाचं बळ विरुद्ध माणसांचं बळ अशी लढाई आम्ही लढणार आहोत. लोकांनी आता ठरवायचं आहे की, त्यांना पैसे हवेत की काम करणारा माणूस हवा आहे. फक्त माहीमच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला सांगेन, गेली पाच वर्ष जनतेने सर्व कारभार बघितलेला आहे."
"जर तुम्हाला कामं करुन हवी असतील तर आम्हाला निवडून द्या आणि जर जनतेला पाच वर्षातून एकदा पैसे हवे असतील तर त्यांना निवडून द्या. शिक्षणाचा, पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न आहे... प्रत्येक मतदार संघात तो प्रश्न आहे, तर तो बेसिक प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकं म्हणताहेत, आम्हाला तरुण उमेदवार हवा आहे" असं टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे