भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:45 PM2024-10-25T17:45:18+5:302024-10-25T17:45:56+5:30
मुंबईतील भायखळा आणि वर्सोवा या दोन जागांवर उद्धव ठाकरेंकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होती. त्यात भायखळ्याचा उमेदवार ठरवण्यात आला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाकडून मुंबईतील काही जागांवर पहिल्या यादीत उमेदवार ठरवण्यात आले. मात्र यात भायखळा जागेवर कुणाला उभं करणार हे निश्चित नव्हतं. मात्र आज मातोश्रीवरील बैठकीत भायखळा विधानसभा मतदारसंघात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भायखळा मतदारसंघात विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात जामसुतकर रिंगणात उतरले आहेत.
मातोश्रीवर आज मनोज जामसुतकर यांना एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी मनोज जामसुतकर म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे यांनी बोलावून पक्षाच्या वतीने एबी फॉर्म दिला आहे त्यामुळे भायखळा मतदारसंघाचा तिढा सुटलेला आहे. २०१२, २०१७ महापालिका निवडणुकीत यामिनी जाधव यांचं आव्हान होते, आता २०२४ च्या आव्हानाला आम्ही पेलून पुढे विजय मिळवू. प्रत्येक मतदारसंघात इच्छुक असतात, पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने भायखळा विधानसभा मतदारसंघाची जागा निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भायखळा मतदारसंघातील यामिनी जाधव यांनी शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केले. त्यामुळे भायखळ्यात ठाकरे गट कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. यामिनी जाधव यांनी मागील निवडणुकीत एमआयएमच्या आमदाराचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र यंदा शिंदेसेनाविरुद्ध ठाकरेसेना अशी लढत भायखळ्यात पाहायला मिळणार आहे.
कोण आहेत मनोज जामसुतकर?
मनोज जामसुतकर हे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते, २०१९ साली ते भायखळ्यातून काँग्रेसकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु त्यावेळी काँग्रेसने मधुकर चव्हाण यांना तिकिट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या मनोज जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जामसुतकर यांना माथाडी कामगारांचे मोठे पाठबळ आहे. जामसुतकर यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यादेखील काँग्रेसच्या माझगाव येथील नगरसेविका होत्या. आता २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मनोज जामसुतकर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भायखळ्यातील ही लढत चुरसीची ठरणार हे निश्चित आहे.