१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:49 PM2024-11-13T15:49:25+5:302024-11-13T15:51:39+5:30

निवडणुकीच्या काळात १७ तारखेला सभा घेण्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळावं मनसे- ठाकरे गटाने अर्ज दिले होते. त्यात मनसेला परवानगी मिळाली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - MNS chief Raj Thackeray Sabha will be held at Dadar Shivaji Park ground on November 17 | १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता १८ नोव्हेंबरला होणार आहे. तत्पूर्वी रविवारी १७ नोव्हेंबरला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन असल्याने त्यावेळी आमच्याशिवाय कुणाला परवानगी देऊ नका अन्यथा संघर्ष होण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. मात्र नगरविकास विभागाकडून मनसेला सभेसाठी परवानगी मिळाल्याचं समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी उद्धवसेना आणि मनसे यांनी केलेले अर्ज आणि स्मरणपत्रे मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाने नगरविकास खात्याकडे पाठवले होती. शिवाजी पार्कवर १० नोव्हेंबरला शिंदेसेनेची सभा होणार होती. १२ नोव्हेंबरला भाजपाचीही सभा झाली नाही.१४ नोव्हेंबरला अजित पवार गटाला मैदानात सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे याच दिवशी महायुतीची एकत्रित सभा होण्याची शक्यता आहे.

सभा आणि विविध कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क ४५ दिवस आरक्षित असते. उद्धव ठाकरे गटाने अर्ज करण्यापूर्वीच मनसेने १७ नोव्हेंबरसाठी अर्ज केला होता. त्यामुळे प्रथम येणाऱ्या प्राधान्य याधर्तीवर मनसेला या मैदानावर सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाजी पार्क मैदानावरील राजकीय सभा या कायम चर्चेचा केंद्रबिंदु राहिल्या आहेत. मुंबईतील ३६ मतदारसंघातील माहीम, वरळी, शिवडी, भांडुप यासह विविध मतदारसंघातील प्रमुख लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

आचारसंहितेमुळे १८ नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावतील त्यामुळे १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी मनसे आणि ठाकरे गटात चढाओढ लागली होती. त्यात मनसेने बाजी मारली आहे. १४ नोव्हेंबरला पुणे, १५ नोव्हेंबरला भिवंडी, ठाणे, दिवा इथं राज ठाकरेंच्या सभा होणार आहेत. त्याशिवाय १६ नोव्हेंबरला नाशिकमध्ये राज ठाकरेंचं भाषण होईल. त्यानंतर १७ आणि १८ नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्क आणि काळाचौकी येथे राज ठाकरेंची सभा होईल. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन असून त्याठिकाणी आम्हाला शिवाजी पार्कला सभा घ्यायची आहे. त्यादिवशी हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येतील. त्यामुळे आयोगाने आणि पोलिसांनी आडमुठेपणा करून संघर्ष होऊ देऊ नये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. त्याशिवाय मला माहिममध्ये सभा घेण्याची गरज नाही असंही ठाकरेंनी सांगितले होते.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - MNS chief Raj Thackeray Sabha will be held at Dadar Shivaji Park ground on November 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.