"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:22 PM2024-11-07T19:22:33+5:302024-11-07T19:31:43+5:30

मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत असल्याचा आरोप करत अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 MNS leader Akhil Chitre joined Shiv Sena in the presence of Aditya Thackeray | "राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा

"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा

Akhil Chitre : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा हादरा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे वरळीतील शिंदे गटाच्या शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे मनसेला आजच्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाने गेली अनेक वर्षे मनसेसोबत असणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला आहे. यावेळी पक्ष सोडताना मनसेच्या माजी नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. 

मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. वांद्रे पूर्व येथेून मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे अखिल चित्रे प्रचंड नाराज होते. अखिल चित्रे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून आपली नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता चित्रे यांनी मनसेला रामराम करत मशाल हाती घेतली आहे. मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत आहे, असा आरोपही अखिल चित्रे यांनी केला आहे. तसेच वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी असल्याचेही चित्रे म्हणाले.

ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी अखिल चित्रे यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा. असो, जय महाराष्ट्र!," असं अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

वरुण सरदेसाईंना जिंकून आणायची माझी जबाबदारी - अखिल चित्रे

"१८ वर्षे मी मनसेमध्ये काम केलं. मात्र जो पक्ष ज्या विचारांसाठी सुरू झाला होता ते विचार बाजूला ठेवून आता हा पक्ष चालत आहे. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोक उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही, तर दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढत आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही. मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या. त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली. तृप्ती सावंत जिंकण्यासाठी लढल्या असत्या तर मी त्यांच्यासोबत असतो पण कोणालातरी पाडण्यासाठी तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर ते योग्य वाटत नाही. आधीच्या पक्षाला ज्याला पाडायचं होतं त्याला मी पाडू देणार नाही ही जबाबदारी आता माझी आहे. वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे," असं अखिल चित्रे यांनी म्हटलं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 MNS leader Akhil Chitre joined Shiv Sena in the presence of Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.